Tue, Aug 04, 2020 10:52होमपेज › Pune › लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पुणेकरांची खरेदीसाठी धावपळ

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पुणेकरांची खरेदीसाठी धावपळ

Last Updated: Jul 11 2020 1:22AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

येत्या सोमवारपासून पुढील पंधरा दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. या संदर्भात पुण्याच्या पालकमंत्र्यांनी शुक्रवारी माहिती दिली. त्यामुळे दुपारनंतर बाजारात नागरिकांची खरेदीसाठी धावपळ उडाली.

शहरातील प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या मंडईत, तर भाजी खरेदीसाठी महिला वर्गाची प्रचंड गर्दी झाली होती. अनेक जण आपल्यासोबत आणलेल्या कापडी पिशव्या भाजीने फुल्ल भरून घरी घेऊन जात होते. तशीच काहीशी स्थिती शहरात असलेल्या किराणा मालाच्या दुकानांबाहेरदेखील पाहायला मिळाली. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपूर्वी उडालेली खाण्यापिण्याची धांदल लक्षात घेऊन, बहुतांश नागरिकांनी शुक्रवारी दुपारी घराबाहेर पडत तांदूळ, गहू, विविध प्रकारच्या डाळी, साखर, चहा पावडर, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा किराणा भरला.

त्याचबरोबर, तुळशीबाग परिसरातसुद्धा महिलांची गर्दी पाहायला मिळाली. रविवार पेठ, बोहरी आळी परिसरात घरांच्या छतावर टाकावयाच्या प्लास्टिक पिशव्या, ताडपत्री खरेदीसाठीसुद्धा गर्दी झाली होती. तर डीमार्टसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या मॉल बाहेरही गर्दी पाहायला मिळाली. बहुतांश नागरिक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दुपारनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले होते.

भुसार बाजार उद्या सुरू राहणार

पुणे : जिल्हा प्रशासनाने 13 जुलैपासून लॉकडाऊन पुकारला आहे. या कालावधीत मार्केट यार्डातील भुसार बंद राहणार आहे. आज (शनिवारी) हा बाजार सुरू असतो, तर रविवारी साप्ताहिक सुटी असते. लॉकडाऊन काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारी (दि. 12) गूळ-भुसार बाजार सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारीही अन्नधान्य आणि किराणाची खरेदी शहरातील विक्रेत्यांना करता येणार असल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी दिली.

पोलिस सज्ज

शहरात वाढता कोरोना संसर्ग पाहता सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्यास त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तयारी करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी सहकार्य करून लॉकडाऊनमधील नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे अवाहन सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नागरिकांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून आला. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्यादेखील शहरात झपाट्याने वाढताना दिसत होती. त्याच पार्श्वभूमीवर मागील आठवड्यापासून पोलिसांनी तयारी केली असून, पुणे पोलिसांनी कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. विनापरवानगी संचार, मास्क न वापरणे, वाहनांवरून संचार, पदपथावरून वाहन चालवणे आदी कारणांसाठी ही कारवाई करण्यात येत आहे. सध्या शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये बंदोबस्तासाठी 278 अधिकारी आणि 1196 कर्मचार्‍यांना नेमण्यात आले असल्याचे शिसवे यांनी सांगितले. 

शिथिल केलेल्या निर्बंधांचा विनियोग नागरिकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी अपेक्षित आहे. अद्याप कोरोनाचा धोका टळला नसून, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन होणे अत्यावश्यक आहे. यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी व सार्वजनिक ठिकाणी दक्षता घ्यावी, असे आवाहन शिसवे यांनी केले आहे.