Wed, Jun 23, 2021 02:31
पुणे : छोटा राजनच्या पुतणीला अटक! ५० लाखांच्या खंडणी प्रकरणी कारवाई

Last Updated: May 18 2021 6:26PM

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पिस्तुलातून गोळ्या घालण्याची धमकी देत ५० लाखांची खंडणी मागणार्‍या व तब्बल सव्वा वर्ष फरार असलेल्या तसेच छोट्या राजनची सख्खी पुतणी असलेल्या प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय ३९, रा. अनिता अपार्टमेंट, जांभुळकर चौक, वानवडी) हिला अखेर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक २ ने तिला वानवडी येथील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने तिला २० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

यापूर्वी याप्रकरणात धीरज बाळासाहेब साबळे (२६, रा. मु. पो. धानोरे, विकासवाडी, ता. खेड जि. पुणे), मंदार सुरेश वाईकर (४१, रा. वनतेय सोसायटी, बिबवेवाडी, कोंढवा रोड) यांना अटक करण्यात आली होती. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याबाबत एकाने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार ८ मार्च २०२० ते १३ मार्च २०२० दरम्यान घडला.

अटक आरोपींनी संगनमत करून निकाळजे हिने फिर्यादी यांना त्यांच्या पत्नीने माझ्याकडे तक्रार केली असल्याचे व मी माझ्या लेटर पॅडवर तुमच्या विरुद्ध कारवाई होण्याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे सांगितले होते. जर तुमच्यावर गुन्हा दाखल करायचा नसेल तरे मला ५० लाख रुपये द्यावे लागतील. त्यातील २५ लाख मी स्वतः घेणार आणि २५ लाख तुमच्या पत्नीला आणि मेव्हुणीला यांना देणार असल्याचे सांगितले होते. तसेच मी गँगस्टर छोटा राजनची सख्खी पुतणी असल्याचे सांगत प्रियदर्शनी निकाळजे हिने फिर्यादीला धमकावून पिस्तूल हातात घेऊन पिस्तुलात दहा गोळ्या असल्याचे सांगत ते पिस्तूल फिर्यादीवर रोखले तसेच जर तू ५० लाखांची खंडणी दिली नाही व तुझ्या पत्नीला घटस्फोट दिला नाही तर दहाच्या दहा गोळ्या घालून मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही वारंवार निकाळजे हिने खंडणीसाठी धमक्या दिल्याबाबत लष्कर पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर दोघांना २५ लाखांची खंडणी घेताना रंगेहात दोघांना अटक करण्यात आली होती. 

दरम्यान, निकाळजे हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही फरार असलेल्या निकाळजेला पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे, उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, अंमलदार सचिन अहिवळे, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, सुरेंद्र जगदाळे, अमोल पिलाने, मोहन येलपल्ले, भूषण शेलार, संग्राम शिनगारे, संपत अवचरे यांच्या पथकाने वानवडी येथील घरातून बेड्या ठोकल्या. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता पिस्तूल जप्त करण्यासाठी, पिस्तूल कोठून आणले, गुन्ह्यात गँगस्टर छोटा राजनचा प्रत्यक्ष संबंध आहे का? याच्या तपासासाठी निकाळजेच्या पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील संतोषकुमार पाटाळे यांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक विजय झंजाड करीत आहेत.