Wed, May 19, 2021 05:22
पुणे : काम केअर टेकरचे अन्‌ धंदा दरोड्याचा! दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, चतुःश्रृंगी पोलिसांची कामगिरी

Last Updated: May 03 2021 8:18PM

पुणे : पुढारी वृत्तसेवा

केअर टेकर म्हणून घरात दाखल झाल्यानंतर, रेकी करून रात्रीच्यावेळी दरोडा टाकत जेष्ठ दाम्पत्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला चतुःश्रृंगी पोलिसांनी औरंगाबाद, जालना, नाशिक, पैठण येथून ताब्यात घेतले. शहरातील विविध नर्सिंग ब्यूरोमध्ये आरोपी केअर टेकर म्हणून नोंदणी करत होते. काही दिवसानंतर तेथील काम सोडून दरोडा टाकत होते. 

संदीप भगवान हांडे (वय 25, रा. पिंपळखेडा, औरंगाबाद), मंगेश बंडू गुंडे (वय 20,रा.वडीकाळ्या, जि. जालना), राहूल कैलास बावणे (वय.22, रा.पीर कल्याण, जालना), विक्रम दिपक थापा उर्फ बिके (वय.19, रा. विनयनगर, नाशिक), किशोर कल्याण चनघटे (वय.21, रा. औरंगाबाद), भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (वय.25, रा. औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यावेळी त्यांच्या ताब्यातून, तीन दुचाकी, सोन्याच्या हिऱ्याचे दागिणे, कॅमेरा असा साडेसतरा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

संदीप, मंगेश व राहूल या तिघांनी मिळून सिंध सोसाटीत दाम्पत्याला लुटले होते. तर सहा जणांनी तीन मार्च २०२१ रोजी वृंदावन सोसाटीत एका जेष्ठ दाम्पत्याला अशाच प्रकारे लुटले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील सिंध सोसायटीमधील एका बंगल्यात २५ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारा घुसून जेष्ठ दाम्पत्याला व त्यांच्या कुकला चाकूच्या धाक दाखवून बाथरुमध्ये कोंडले. त्यानंतर घरातील १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरी करून चोरट्यांनी पळ काढल्याची घटना घडली होती. पंधरा ते वीस मिनिटांनी बाथरूमचा दरवाजा उघडून बाहेर आल्यानंतर दाम्पत्याने मुलाला फोन करून झालेली घटना सांगितली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत एका ७३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. 

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत तपास करत असताना पोलिसांना हा दरोडा संदीप हांडे व त्याच्या साथीदारांनी टाकल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार चार दिवस पुणे, औरंगाबद, जालना शहरात धडक मारून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशी त्यांनी हा गुन्हा केल्याची कबूली दिली. यावेळी पोलिसांनी इतर सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलिस आयुक्त रमेश गलांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे, गुन्हे निरीक्षक दादा गायकावाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महोनदास जाधव, महेश भोसले, कर्मचारी दिनेश गंडाकुश, मकुंद तारु, प्रकाश आव्हाड, श्रीकांत वाघवले, प्रमोद शिंदे, संतोष जाधव यांच्या पथकाने केली. 

रेकी आणि रात्रीच्यावेळी दरोडा

संदीप हांडे हा टोळीचा प्रमुख आहे. त्याने आत्तापर्यंत विविध शहरातील १६ ते १७ नर्सिंग ब्युरोत केअर टेकर पदासाठी नोंदणी केली आहे. यापुर्वी देखील त्याने पिंपरी - चिंचवड परिसरातली एका जेष्ठ महिलेला चाकूच्या धाकाने लुटले होते. याप्रकरणी, निगडी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

- अशाच प्रकारे त्याने संबंधीत जेष्ठ महिलेला चाकूचा धाक दाखवून टॉवेलने हात बांधून बाथरुममध्ये कोंडले. त्यानंतर घरातील सव्वा चार लाखाचा ऐवज चोरी केला होता. 

- आरोपी हांडे व त्याचा साथीदार मिथून जगात या दोघांनी संगणमत करून सिंध सोसायटीतील याच जेष्ठ दाम्पत्याच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डाचा नंबर मिळवून पावने दोन लाखाला गंडा घालात होता. ही घटना २०१९ मध्ये घडली होती.

- तेव्हापासून हांडे तेथे कामाला नव्हाता, मात्र त्याला घराची पूर्ण माहिती होती. त्यातूनच त्याने इतर दोघांना बरोबर घेऊन रात्रीच्यावेळी बंगल्याच्या पाठीमागच्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून तोंड बांधून तो कमी बोलत होता. 

शहरात वास्तव्यास असलेल्या जेष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनमुळे मुले व इतर नातेवाईक दुसऱ्या शहरात अडकून पडले आहेत. त्यामुळे घरात काळजी घेण्यासाठी केअर टेकरचा आधार घेतला जातो आहे. मात्र असे गुन्हे पाहता नागरिकांनी केअर टेकर ठेवताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पूर्ण खात्री करून नोंदणीकृत एजन्सीजकडून केअर टेकर घ्यावा. 

पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त पुणे शहर