Thu, Oct 29, 2020 07:59होमपेज › Pune › २३ गावांच्या समावेशाचा निर्णय आता महापालिकेच्या हाती !

२३ गावांच्या समावेशाचा निर्णय आता महापालिकेच्या हाती !

Last Updated: Oct 19 2020 2:08AM
पुणे : पांडुरंग सांडभोर

हद्दीलगतच्या गावांना महापालिकेत समाविष्ट करण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला. तसेच गावे समाविष्ट करण्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने न्यायालयात दाखलही केले असले तरीही आता पुन्हा राज्य सरकारने 23 गावांच्या समावेशाबाबत महापालिकेचा अभिप्राय मागवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्य शासन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आणि पुणे महापालिका भाजपकडे अशी स्थिती असल्याने नेमका निर्णय काय होईल, याविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे.
  
गावांचा समावेश केल्यास महापालिकेचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे सोयी-सुविधांवर ताण येणार असल्याने ही गावे समाविष्ट करण्यासंबंधीचा अभिप्राय द्यावा, असे नगरविकास खात्याकडून महापालिकेला कळविण्यात आले आहे.

पुणे महापालिका हद्दीलगतची 34 गावे तीन वर्षांत टप्प्या-टप्प्याने समाविष्ट केली जातील, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने न्यायालयात सादर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर 2017 ला 11 गावांच्या समावेशाची अधिसूचनाही काढली. पुढच्या टप्प्यात म्हणजेच ऑक्टोबर 2020 पर्यंत उर्वरित 23 गावांचा समावेश होणे आवश्यक होते. आता मात्र, ही मुदत संपत आली असतानाच राज्य शासनाने गावांच्या समावेशासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी नगरविकास खात्याने नुकतेच पत्र पाठवून महापालिकेचा अभिप्राय विचारला आहे.

- काय म्हटले आहे नक्की शासनाने--

23 गावांचा समावेश करताना पाण्याची उपलब्धता आणि पाणी नियोजन, कचर्‍याचे नियोजन, प्रस्तावित रिंगरोड, वाढणारी लोकसंख्या व त्यांना सुविधा पुरविण्यासाठी आपल्याकडे कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे का, इत्यादी सर्व बाबींचा विचार करण्यात यावा. तसेच गावांच्या समावेशामुळे महापालिकेचे भौगोलिक क्षेत्रफळ व लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. अशा परिस्थितीत गावे महापालिकेत समाविष्ट करावीत किंवा कसे  याबाबत तातडीने अभिप्राय पाठवावा, असे शासनाने पत्राद्वारे कळविले आहे.

- मुख्यसभेच्या ठरावाची गरज नाही-

हद्दीलगतची 34 गावे पालिकेत समाविष्ट करण्यास महापालिकेने मुख्यसभेचा ठराव करून यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा महापालिकेच्या मुख्यसभेची मंजुरीची आवश्यकता असणार नाही. त्यामुळे आता पालिका प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

- राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही

गावांच्या समावेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे. गत महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यात पदाधिकार्‍यांनी आगामी पालिकेच्या दृष्टीने गावांच्या समावेशाची मागणी केली होती. त्यात पवार यांनी सकारात्मकता दर्शविली होती. त्यानंतर आता गावांच्या समावेशाच्या हालचालींना सुरवात झाली आहे.

हद्दीलगतची उर्वरित 23 गावे-

बावधन, किरकटवाडी, म्हाळुंगे, सूस, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, नर्‍हे, खडकवासला, शेवाळेवाडी, नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, कोळेवाडी, मंतरवाडी, येवलेवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी, वडाची वाडी, पिसोळी, जांभूळवाडी, कोळेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी.पायाभूत सुविधांची चाचपणी-
महापालिकेच्या हद्दीत 11 गावांचा समावेश तीन वर्षांपूर्वी झाला होता आणि या काळात महापालिकेने पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत का, याची चाचपणी करण्यासाठीच हे पत्र आहे. महापालिकेच्या उत्तरानंतर गावांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण नगरविकास खात्यातील सूत्रांकडून देण्यात आले.

23 गावांच्या समावेशास भाजपचा विरोध नाही. मात्र, यापूर्वी जी 11 गावे घेतली आहेत, त्यांचा अद्याप विकास आराखडा झालेला नाही. पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत, त्यामुळे आधी या गावांमध्ये सुविधा उभारून उर्वरित गावेही टप्प्या-टप्प्याने घ्यावीत, अशी आमची भूमिका आहे.
- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे.

 "