पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळातील संपूर्ण वीज बिल माफ करावे, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे; अन्यथा राज्यात तीव— आंदोलन करू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
निर्णय होईपर्यंत वीज बिल आम्ही भरणार नाही. सरकारकडून वीज कनेक्शन तोडल्यास प्रसंगी आम्ही कायदा हातात घेऊ, असेही ते म्हणाले. 23 मार्च ते जून महिन्यापर्यंतचे वीज बिल माफ करण्याची आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही जून महिन्यापासून आंदोलन करीत आहोत. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महिन्याला 100 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना मोफत वीज देण्याची भूमिका घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. संपूर्ण वीज बिलमाफीची आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.
सातारा ते कराड पायी मोर्चा
केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 23 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत सातारा ते कराड पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.