Thu, Nov 26, 2020 20:10होमपेज › Pune › शरद पवार अभ्यास नसलेले छोटे नेते

शरद पवार अभ्यास नसलेले छोटे नेते

Last Updated: Nov 22 2020 1:06AM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलपुणे : पुढारी वृत्तसेवा

राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी खरमरीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली आहे. दुसरीकडे, पाटील यांनी देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते असल्याचे प्रमाणपत्रही दिले आहे. 

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यात आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस अत्यंत अभ्यासू नेते आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्‍का लागणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी खोलात जाऊन कायद्याचा अभ्यास केला आहे. मराठा समाज ओबीसीमध्ये घुसूच शकत नाही, याची व्यवस्था केली आहे. मात्र, राजकारणासाठी काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम करीत आहेत. राजकारणासाठी समाजात विष कालवण्याचे काम करणार्‍यांचा शर्ट धरला पाहिजे, असेही पाटील म्हणाले. 

पदवीधर व शिक्षक या दोन्ही जागा जिंकण्यासाठी जे जे करावे लागेल, ते ते करा. ही निवडणूक एकतर्फी असल्याने आपला विजय निश्‍चित आहे. राज्यातील विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्यावरच राज्यातील महाभकास आघाडीला नागरिकांच्या मनात किती रोष आहे हे कळेल,असेही पाटील म्हणाले.