Mon, Sep 28, 2020 09:11होमपेज › Pune › शालेय सहलींसाठी एसटी सुसाट

शालेय सहलींसाठी एसटी सुसाट

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 17 2018 11:46PM

बुकमार्क करा
पिंपरी : नरेंद्र साठे

शालेय शिक्षण विभागाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार शाळांनी यावर्षी सहलींसाठी एसटीलाच पसंती दिली आहे. शालेय सहलींची नियमावली कडक केल्यामुळे खासगी बसचा पर्याय निवडणार्‍या अनेक शाळांनी आता एसटीनेच विद्यार्थ्यांना सहली घडवल्या आहेत. आणखी काही शाळांचे बुकिंग झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू हंगामातील एकाच महिन्यात वल्लभनगर आगाराला दुप्पट कमाई झाली आहे.

हिवाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनासुद्धा या दिवसांत वेध लागतात ते शैक्षणिक सहलींचे. सहलींसाठी एसटी महामंडळातर्फे शाळा-महाविद्यालयांना सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. अजिंठा, वेरूळ, महाबळेश्‍वर, पाचगणी, मालवण, कोकण किनार्‍यासह पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा असलेल्या शहर व पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली आयोजित करतात.

शालेय सहलींदरम्यान झालेल्या काही मोठ्या अपघातांमुळे सहलींचे नियम अधिक कडक करण्यात आले. यामध्ये एसटीने सहल घेऊन जाण्याचा देखील नियम आहे. पूर्वी या नियमांकडे शाळांकडून दुर्लक्ष केले जाई; परंतु एसटी बस नसल्यास परवानगी मिळत नसल्याने शाळांना देखील खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय बंद झाला आहे. 

वल्लभनगर आगाराचे गेल्या वर्षीच्या सहलीच्या हंगामात 19 हजार किलोमीटर पूर्ण झाले होते, तर यावर्षी केवळ डिसेंबर महिन्यातच 38 हजार किलोमीटर पूर्ण झाले आहेत. केवळ डिसेंबर महिन्यामध्ये शालेय सहलींमधून वल्लभनगर आगाराला 6 लाखांचे उत्पन्न मिळाले. 

आकर्षक रंगसंगतीच्या बसचे काय झाले?

मागील वर्षी वर्‍हाडासाठी आणि शालेय सहलींसाठी आकर्षक रंगसंगती असलेल्या बस सुरू करणार असल्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली. त्यानुसार दापोडीतील मध्यवर्ती कार्यशाळेत बस तयार करण्यात आलीदेखील; परंतु मंत्र्यांनी तयार झालेल्या बसची पाहणी केल्यानंतर बससंदर्भात नाराजी व्यक्त करून आणखी बदल सुचवले होते; परंतु त्या बस पुढे आगारात आल्याच नसल्याने नेमके काय झाले, हे स्थानिक अधिकार्‍यांना माहिती नाही.