राजगुरूनगर (पुणे) : पुढारी वृत्तसेवा
ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी आणलेले ४ पिस्तूल, ८ राउंड असे १ लाख, ७४ हजार, ८०० रुपये किमतीचे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक अन्वेषण गुन्हे शाखा पथकाच्या पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे.
राजगुरूनगर एसटी बसस्थानक आवारात काल (बुधवार) केलेल्या या कारवाईत प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ, (वय. २८, रा. वाळद, ता. खेड, जि. पुणे) व निलेश उर्फ दादा राजेंद्र वांझरे, (वय. २४, रा. वांझरवाडी ता. दौंड, जि. पुणे) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक वाचा : 'कुणी आरोप केला म्हणून धनंजय मुडेंचा राजीनामा घेणार नाही'
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खेड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून पोलिस विविध उपाययोजना करीत आहेत. याचाच भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने उत्तर पुणे जिल्ह्यातील विविध भागात गस्त घालून सुरक्षेचे उपाय योजले जात आहेत. पथकाला बुधवारी मिळालेल्या माहितीनुसार राजगुरूनगर बसस्थानक आवारात दोन इसम अवैध पिस्तूल घेऊन येणार असल्याचे समजले. पथकाने सापळा रचला. संशयित दोघांना गाठून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दोघांची झडती घेतल्यावर प्रत्येकाकडे कमरेला दोन, दोन पिस्तुल आणि ८ काडतुसे मिळाली.
दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी खेड पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली पोलिस सहनिरीक्षक अमोल गोरे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, अक्षय जावळे, दत्तात्रय जगताप, स फो शब्बीर पठाण, विद्याधर निच्चीत, मुकुंद आयाचित, प्रमोद नवले, सागर चंद्रशेखर, प्रसन्न घाडगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.