Wed, May 19, 2021 05:23
पुणे : मृत व्यक्तीच्या खात्यामध्ये फेरफार करून काढले पैसे; बँक मॅनेजरसह दोघांना अटक 

Last Updated: May 04 2021 9:39AM

पुणे : पुढारी वृत्तसेवा 

मृत व्यक्तीच्या बँक खात्यात फेरफार करून पैसे काढल्या प्रकरणी बँकेच्या मॅनेजरसह एका अधिकाऱ्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये जुबेन गांधी (वय ३५, रा. विमाननगर) आणि एक महिलेचा समावेश आहे. याबाबत चंद्रशेखर राजगोपालन (रा. विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. दोघांनी इतर काही खातेधारकांचे पैसे काढल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.   

अधिक वाचा : डबल म्युटंटचा महाराष्ट्राला तडाखा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांच्या वडिलांचे विमाननगर येथील एका नामांकित बँकेत बचत खाते आहे. दरम्यान त्यांचे वडील ज्येष्ठ नागरिक व आजारी असल्यामुळे महिला रिलेशन अधिकारी घरी जाऊन मदत करत होती. मार्च २०२१ फिर्यादींच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांना एक संशयास्पद व्यवहाराचा मेसेज आला. त्यावेळी त्यांना खातेधारकाची बनावट सही असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी खात्यामध्ये साडेचार हजार रूपये शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. तसेच, फिर्यादींच्या वडिलांच्या बनावट सह्या करून फिक्स डिपॉझिट बंद करण्यासाठी अर्ज केल्याचे समजले. यावेळी वडिलांच्या खात्यातून दोन लाख ३७ हजार रूपये काढून घेतल्याचे दिसून आले.   

अधिक वाचा : परमबीर यांनी ३.४५ कोटी उकळले

याबाबत त्यांनी पोलिस स्‍टेशनमध्ये धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला होता. तपास करून चौकशी केली असता, संबंधीत बँकेच्या मॅनेजर व महिला रिलेशन अधिकाऱ्याने पदाचा दुरूपयोग करून हे पैसे काढल्याचे समोर आले आहे. फिर्यादींच्या वडिलांच्या खात्याचा केवायसी बदलण्यासाठी मोबाईल क्रमांक देखील आरोपींनी बदलला. त्यानंतर एका म्युचअल फंड कंपनीत तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अर्ज करून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. या आरोपींनी आणखी किती खातेदारांची फसवणूक केली आहे ? याचा तपास केला जात आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, मंगेश जगताप यांनी ही कारवाई केली.