Mon, Apr 12, 2021 02:30
पुणे : पाच दिवसाच्या आंदोलनानंतर महिला सावकारावर गुन्हा दाखल 

Last Updated: Mar 20 2021 6:40PM

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

इंदापूर पोलिस ठाण्यासमोर मागील पाच दिवसांपासून महिला सावकारांच्या विरोधात चालू असलेले उपोषण आंदोलन अखेर सावकारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थगित झाले. संतोष मारुती शिंदे (वय 39, रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरुन छबाबाई श्रीरंग कांबळे (रा. वरकुटे खुर्द) व अन्य एकावर इंदापूर पोलिस स्‍टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात माहिती अशी की, संतोष शिंदे यांनी सन 2018 मध्ये छबाबाई कांबळे यांच्याकडून घरगुती कामासाठी 84 हजार रुपये 10 टक्के व्याजाने घेतले होते. त्या व्याजापोटी शिंदे हे सावकार छबाबाई यांना प्रत्येक महिन्याला 8 हजार 400 रुपये देत होते. नोव्हेंबर 2020 पर्यंत शिंदे यांनी छबाबाई यांना 2 लाख 52 हजार रुपये दिले आहेत.

अधिक वाचा : पाकिस्‍तानचे पंतप्रधान इमरान खान कोरोना पॉझिटीव्ह

लॉकडाऊन काळात संतोष शिंदे यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी छबाबाई यांना व्याजाचा हप्ता देणे बंद केले. या कारणावरून छबाबाई यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी शिवीगाळ व दमदाटी करून तू माझ्याविरुद्ध तक्रार केल्यास मी तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. यावेळी अन्य एका अनोळखी व्यक्तीने संतोष शिंदे यांची पीकअप गाडी (एमएच ४२ जीटी ९२७४) त्यांच्या घरासमोरुन जबरदस्तीने नेली.

संतोष शिंदे व त्यांच्या पत्नी यांनी याबाबत 22 फेब्रुवारी 2021 रोजी इंदापूर पोलिस ठाण्यास आपला तक्रार अर्ज दाखल केला होता; मात्र त्याची दखल न घेतल्याने शिंदे दाम्पत्याने आंदोलनाचा बडगा उगारला. अखेर आंदोलनाच्या पाचव्या दिवशी या महिला सावकारावर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने हे आंदोलन स्थगित झाले. या घटनेचा तपास प्रभारी पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शंकरराव वाघमारे करीत आहेत.