Sat, Aug 08, 2020 14:43होमपेज › Pune › मावळमध्ये युतीतील धुसफूस सुरूच

मावळमध्ये युतीतील धुसफूस सुरूच

Published On: Mar 20 2019 1:41AM | Last Updated: Mar 20 2019 12:07AM
पिंपरी : जयंत जाधव

मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव जाहीर करून मागील रविवारी (दि.17) चिंचवड-वाल्हेकरवाडी येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘शेकाप’चे प्रदेश सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. परंतु; शिवसेना भाजपमधील वादामुळे अद्याप युतीचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. 

मावळ लोकसभा मतदारसंघात युतीमधील स्थानिक नेत्यांमध्ये सुसंवाद चांगला राहावा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट व शिवसेनेच्या उपनेत्या आ. डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक मंगळवारी (दि. 19) घेण्यात आली. परंतु; या बैठकीकडे भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप व नगरसेवकांनी पाठ फिरवली. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच नगरसेवक यावेळी उपस्थित होते. त्यामुळे मावळात युतीतील बेबनाव अद्याप कायम असल्याचेच अधोरेखित झाले आहे.   

मावळातील राजकीय बलाबल पाहता शिवसेना-भाजप युतीची ताकद निश्‍चितच वाढलेली आहे. परंतु; राष्ट्रवादी काँग्रेसनेही शेतकरी कामगार पक्षाशी (शेकाप) रायगड जिल्ह्यात आघाडी करून बेरजेचे राजकारण केले आहे. ‘शेकाप’ची घाटाखाली तीन विधानसभा मतदार संघात ताकद असली, तरी घाटावर तीन विधानसभा मतदार संघातही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची ताकद घटलेली आहे, हेही विसरून चालणार नाही. 

परंतु; युतीमध्येच जर बेबनाव राहिला, तर त्याचा फायदा पार्थ पवार यांना होणार की नाही, हे येणारा काळच सांगेल. परंतु; राजकीय बलाबल पाहता सध्या तरी मावळ लोकसभेची वाट पार्थ पवार यांना बिकटच आहे. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त एक जागा राष्ट्रवादीकडे आहे. तर, तीन भाजप व दोन शिवसेनेकडे आहेत. पिंपरी-चिंचवड व पनवेल महापालिकेत सत्ता आहे. एका पक्षाचा विचार केला असता, भाजपाचीच राजकीय ताकद आजच्या घडीला मतदारसंघात वाढली आहे, हे नाकारता येणार नाही. त्यामुळेच शेवटच्या क्षणापर्यंत भाजप ही जागा आपणाला सोडावी म्हणून प्रयत्न करीत आहे.   

भाजपच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी तर यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊ नये व दिल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यापुढे जावून भाजप आमदार जगताप व काही पदाधिकार्‍यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटू घेऊनही हा मतदारसंघ भाजपाला सोडण्याची मागणी केली. अर्थात, उद्धव  ठाकरे यांनी हा मतदारसंघ शिवसेना भाजपाला कदापिही सोडणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते.    थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयाच्या बैठकीतही दिसली.

युतीचा उमेदवार कोण? याकडेच लक्ष

पार्थ पवार यांचे नाव पुढे येताच खासदार बारणे सक्षम उमेदवार होवू शकत नाहीत, असे सांगत उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या. या हालचालींना शिवसेनेतील बारणे विरोधकही खतपाणी घालत आहेत. प्रसंगी आ. जगताप यांनी शिवसेनेची उमेदवारी घ्यावी, ते शक्य नसल्यास तरी आ. जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्यासाठी शिवसेनेकडे प्रयत्न सुरू आहेत. प्रसंगी भाजपला हा मतदारसंघ सोडून बदल्यात जळगावची अथवा अन्य जागा सेनेला देण्याचाही प्रस्ताव आहे. तर, खा. बारणे आपली उमेदवारी निश्‍चित असल्याचे समजून कामाला लागले आहेत. परंतु, उमेदवारी जाहीर होत नसल्याने युतीचा उमेदवार कोण? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.