Tue, Sep 29, 2020 18:41होमपेज › Pune › पोलिस पाटलाच्या ताब्यातील वाहने गायब 

पोलिस पाटलाच्या ताब्यातील वाहने गायब 

Published On: Mar 12 2018 12:53AM | Last Updated: Mar 12 2018 12:20AMवाघोली : दीपक नायक

पूर्व हवेली भागात बेकायदा वाळू उत्खनन होत असल्याचे वृत्त दै.  ‘पुढारी’ने सातत्याने प्रकाशित करून पाठपुरावा केला होता. याची दखल घेत मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी भवरापूर भागात बेकायदा चालू असलेली वाळू चोरी उघड करून वाळू चोरी करणार्‍यांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या वेळी गुन्ह्यातील वाहने अधिकृतपणे भवरापूरचे पोलिस पाटील चंद्रकात टिळेकर यांच्या ताब्यात देण्यात आली होती. सध्या या गुन्ह्यातील वाहने गायब असतानाही पोलिस पाटील वाहने ताब्यात असल्याचे सांगत असले तरी त्या ठिकाणी वाहने ताब्यात नसल्यामुळे त्यांचा बनाव उघड झाला आहे; त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. 

15 दिवसांपूर्वी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात वापरण्यात आलेले 3 ट्रॅक्टर, 3 पोकलेन मशिन अशी एकूण 6 वाहने मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी पंचनामा करून तसेच वाहनांची ताबेपावती करून भवरापूरचे पोलिस पाटील चंद्रकांत टिळेकर यांच्या ताब्यात दिली होती. आता या वाळू चोरी प्रकाराचा तपास लोणी काळभोर पोलिसांकडून करण्यात येत आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी महेंद्र चांदणे यांनी वारंवार सूचना करूनदेखील या गुन्ह्यातील वाहने पोलिस पाटील यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात जमा केली नसल्यामुळे या कारवाईतील काही जप्त केलेली वाहने गायब झाली असल्याचे उघड झाले आहे.  

लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत यातील एक पोकलेन वाहन आढळून आले असून, लोणीकंद पोलिसांनी त्यांची नोंद घेतली आहे. महसूल विभागाने पोलिस पाटील यांच्या घरी अचानक पाहणी करून पोलिस पाटलांच्या ताब्यातील काही वाहने गायब असल्याचा अहवाल नायब तहसीलदार यांना कळविला आहे.  

अनेक मासे गळाला लागणार

दै. ‘पुढारी’मधून विनापरवाना सुरू असलेल्या वाळूमाफियांबद्दल लिखाण करून संबंधित अधिकार्‍यांचे छुपे पाठबळ असल्याचे वृत्त सातत्याने प्रकाशित केले गेले होते.  दैनिक ‘पुढारी’ने 6 मार्च रोजी ‘कुंपणच शेत खात असल्या’चे वृत्त प्रकाशित केले होते.  ते वृत्त खरे ठरले. असून, बेकायदा वाळू उत्खननासाठी वापरण्यात आलेली साधने व वाहनांवर कारवाई करून पंचनामा करण्यात आला होता आणि ती वाहने भवरापूर येथील पोलिस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आली होती;  मात्र जवळपास पंधरा दिवसांपासून गायब झालेली काही वाहने गेली कुठे? संबंधित बेकायदा उत्खनन करणार्‍यांवर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? ताब्यातील वाहने पंधरा दिवसांपासून गायब झाली, मग लगेच का लक्षात आले नाही? संबंधित पोलिस स्टेशनला याबाबत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? या प्रकरणामध्ये आर्थिक तडजोड झाली का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.