Sun, Jan 17, 2021 11:09
राज्यात फक्त निम्म्याच कर्मचार्‍यांना पहिला डोस

Last Updated: Jan 13 2021 2:04AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी एकूण साडेआठ लाख लाभार्थी असून, त्यांना दोन टप्प्यांत 17 लाख डोसची आवश्यकता आहे. मात्र, राज्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘सिरम’कडून 9 लाख 63 हजार डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच लाभार्थ्यांना डोस न देता फक्त 55 टक्केच कर्मचार्‍यांना डोस देण्यात येणार आहे. त्यांनाच 28 दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येईल. 

लसीची उपलब्धता आणि इतर कंपन्यांतील डोस येण्याची शक्यता यामुळे पुढील नियोजन करणे सोपे जावे, म्हणून 55 टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली. राज्यात 16 जानेवारीला सर्व ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारपर्यंत राज्याच्या वाट्याला किती डोस येणार, याबाबत राज्यातील आरोग्य विभागाला माहीत नव्हते. मात्र, दुपारी चारच्या दरम्यान केंद्राकडून आलेल्या सूचनेनुसार राज्याला ‘सिरम’चे 9 लाख 63 हजार डोस देण्यात आले. त्यानंतर हे डोस घेऊन ‘सिरम’चा एक कंटेनर पुण्यातील पुणे स्टेशनजवळील राज्याच्या मध्यवर्ती लस भांडार येथे मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान दाखल झाला. 

या ठिकाणी राज्यातील आठ परिमंडळांच्या (विभागाच्या) गाड्या येणार असून, त्यांना येथूनच लसवाटप करण्यात येणार आहे. त्या विभागातून प्रत्येक जिल्ह्याला हे लसीकरणाचे वाटप होईल. मात्र, कोणत्या जिल्ह्याला किती लस देण्यात येतील, याबाबत मंगळवारी रात्री उशिरा निर्णय होणार आहे, अशी माहिती राज्याचे लसीकरण विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.