Sat, Feb 27, 2021 06:16होमपेज › Pune › पुणे : नायडू रूग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण

पुणे : नायडू रूग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण

Last Updated: Apr 20 2020 10:09PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील २३ वर्षीय नर्सला (परिचारिका) कोरोनाची लागण झाली आहे. या नर्सचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. तिला नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिच्या घरच्याना देखील क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यात सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमधील नर्सेसना देखील कोरोनाची लागण होत आहे. सुरवातीला रुबी हॉलमधील ५० वर्षीय नर्सला लागण झाली होती. त्यानंतर ससूनमधील ४ नर्सचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता नायडू रुग्णालयातील तरुण नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे.      

या नर्स सोबत काम करणारे नायडू हॉस्पिटलमधील अन्य डॉक्टर, परिचारिका किंवा कर्मचारी यांना कोरोनासदृश्य लक्षणे नसल्याने त्यांची चाचणी केली जाणार नसल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

पुण्यात सर्वात आधी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल करण्यात आले होते. पण, गेल्या दीड महिन्यापासून नायडू रुग्णालयामध्ये घेण्यात आलेल्या दक्षतेमुळे कोणात्याच डॉक्टर, नर्स किंवा कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. पण अखेर सोमवारी एका नर्सलाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. ही नर्स सुरूवातीपासून या रुग्णालयात कार्यरत आहे. संबंधित नर्स दररोज घरी जात असल्याने कुटुंबातील सदस्यांनाही क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

दरम्यान, परिचारिकेला संसर्ग झालेला असला तरी अन्य कोणत्याही डॉक्टर किंवा परिचारिकेमध्ये लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांची तपासणी केली जाणार नाही. लक्षणे आढळून आल्यानंतरच त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातील. आतापर्यंतही कोरोना रुग्ण दाखल झाल्यापासून कोणाचीच तपासणी करण्यात आली नव्हती, असे आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.