Sat, Aug 08, 2020 11:13होमपेज › Pune › जबरदस्तीने वसुली कराल तर फौजदारी गुन्हे नोंदवू

जबरदस्तीने वसुली कराल तर फौजदारी गुन्हे नोंदवू

Last Updated: Jul 04 2020 1:14AM
बारामती : पुढारी वृत्तसेवा

फायनान्स कंपन्यांनी ऑगस्ट 2020 अखेर आरबीआयच्या निर्देशाप्रमाणे कर्जवसुली करता कामा नये; तरीही कंपन्यांनी दादागिरी केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवू, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिला आहे.

शहर पोलिस ठाण्यात शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 2)  हप्ते वसुलीच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी बजाज, एयू बँक, एचडीबी, टाटा, महिंद्रा, कोला मंडल, सुंदरम, श्रीराम आदी फायनान्स कंपन्यांचे व्यवस्थापक, वसुली अधिकारी उपस्थित होते. कर्जदाराकडे हप्त्याचा तगादा लावल्यावरून बजाज फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकार्‍यासह अन्य लोकांवर गत आठवड्यात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतरही हप्ते वसुलीचा तगादा सुरू असल्याने उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांनी बैठक घेऊन कारवाईचा इशारा दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे अनेकांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मार्च ते ऑगस्टपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हप्ते वसुलीला स्थगिती दिली आहे. तरीही स्थानिक पातळीवर अनेकांना वसुली अधिकार्‍यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर जबरदस्तीने कर्ज वसुली करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा शिरगावकर यांनी दिला आहे.  फेब—ुवारी 2020 पर्यंतचे कर्जदारांचे प्रलंबित हप्ते वसूल करताना कंपन्यांनी वसुली विभागाला योग्य ती समज द्यावी. महिलांशी त्यांनी सौजन्याने वागावे. कर्ज वसुलीला जातेवेळी ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फायनान्स कंपन्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली असावी. आरबीआयच्या नियमांचे उल्‍लंघन केले तर थेट गुन्हे दाखल केले जातील, असेही सांगितले.  कर्जदारांनीही कंपन्यांकडे अर्ज करून मुदत वाढवून घ्यावी. वसुली अधिकारी, कर्मचार्‍यांनी कोणत्याही कर्जदाराला त्रास देऊ नये, हप्त्याबाबत तगादा लावू नये. ग्राहकांनी हप्त्यावर खरेदी केलेल्या वस्तू वसुली अधिकार्‍यांमार्फत जबरदस्तीने हिसकावून घेण्यात येऊ नये, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.

राजे ग्रुपने उठवला आवाज

बारामतीत फायनान्स कंपन्यांनी जबरदस्तीने सुरू केलेल्या हप्ते वसुलीविरोधात येथील राजे ग्रुपचे अ‍ॅड. भार्गव पाटसकर, गणेश कदम व सहकार्‍यांनी लढा सुरू केला होता. फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयात जात त्यांनी निवेदने दिली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याशी बोलून बैठक घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते.