Sat, Aug 15, 2020 15:56होमपेज › Pune › इसिसशी संबंधित दोघांना दिल्‍लीत हलविले

इसिसशी संबंधित दोघांना दिल्‍लीत हलविले

Last Updated: Jul 14 2020 1:51AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या (इसिस) संपर्कात असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने (एनआयए) पुण्यातून रविवारी दोघांना अटक केल्यानंतर त्यांना तपासासाठी दिल्‍लीस नेले आहे.

सादिया अन्वर शेख (वय 21, रा. येरवडा), नबील सिद्दिकी खत्री (वय 27, रा. कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत. दहशतवाद्यांशी संपर्कात असल्याच्या संशयावरून सादियाला आतापर्यंत तिसर्‍यांदा ताब्यात घेतले आहे. एनआयए, दिल्‍ली पोलिसांच्या विशेष पथकांनी दिल्‍लीतील जामियानगर परिसरातून इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या संशयावरून मार्च महिन्यात एका डॉक्टर दाम्पत्याला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील चौकशीत नबील खत्री, सादिया शेखची नावे पुढे आली. एनआयएने  नजर ठेवली असता ते  पुण्यात स्लीपर सेल म्हणून काम करत असल्याचे आढळल्यावर पुण्यात त्यांना अटक केली. 

राज्य दहशतवादविरोधी पथक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने एनआयएने विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कळस येथे कारवाई करून रविवारी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे तपास यंत्रणांच्या हाती लागली आहेत. नबील खत्री हा कोंढव्यात जिम ट्रेनर म्हणून काम करतो. सादिया शेख अल्पवयीन असल्यापासून इसिसच्या संपर्कात असल्याचा संशय आहे.

संशयास्पद सादिया 

सादिया शेखची भूमिका आजवर नेहमीच संशयास्पद राहिली आहे. यापूर्वी पुणे एटीएसने 2015 मध्ये सादिया शेखवर नजर ठेवली होती. त्यात ती इसिसच्या संपर्कात असल्याचे इंटरनेटवरील पडताळणीवरून लक्षात आले होते. त्यानंतर तिचे अनेक दिवस समुपदेशन केले होते. त्यासाठी मौलवींची मोठी मदत झाली होती. आईसमोर तिने आता त्यांच्याशी संपर्कात नसल्याचे सांगितले होते. 2018 मध्ये पुण्यातील एक तरुणी काश्मीरमध्ये मानवी सुसाईड बॉम्बर म्हणून आल्याची खबर गुप्तचर विभागाने दिली होती. 26 जानेवारीच्या पार्श्‍वभूमीवर ही खबर आल्याने संपूर्ण काश्मीरमध्ये अलर्ट दिला होता. चौकशीनंतर तिला सोडून दिले होते. या प्रकरणी  सादिया,तिच्या आईने पत्रकार परिषदही घेतली होती. सादियावर पोलिसांची सतत पाळत होती. तिच्या कॉलेजमध्ये जाऊनही पोलिसांनी चौकशी केली होती. पुण्याला वैतागल्याने शिक्षणासाठी काश्मीरला आल्याचा खुलासाही तिने केला होता. त्या प्रकरणावर पडदा पडला असताना 2 वर्षानंतर पुन्हा  तिचे नाव पुढे आले आहे.