Thu, Oct 29, 2020 06:43होमपेज › Pune › ज्याचा वशिला त्यालाच आयसीयू, व्हेंटिलेटर!

ज्याचा वशिला त्यालाच आयसीयू, व्हेंटिलेटर!

Last Updated: Sep 21 2020 1:39AM
पुणे : पांडुरंग सांडभोर

कोरोना रुग्णांना उपचारासाठी आयसीयू अथवा व्हेंटिलेटर बेड्सची गरज असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे राजकीय अथवा प्रशासकीय ओळख पाहिजे, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर दिल्‍लीतील एका संस्थेने घेतलेल्या ऑनलाइन सर्व्हेत 32 टक्के रुग्णांना वेगवेगळ्या वशिल्याच्या माध्यमातूनच आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळाले असल्याचे समोर आले आहे. 

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. त्यात गंभीर रुग्णांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे आता शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीव गमवावा लागला असल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता जर तुम्हाला आयसीयू अथवा व्हेंटिलेटरची आवश्यकता असेल, तर राजकीय, प्रशासकीय अथवा अन्य तगड्या वशिल्याची गरज लागणार आहे. धक्‍कादायक म्हणजे आतापर्यंत रुग्णांना आणि त्याच्या नातेवाइकांना बेड्स मिळविण्यासाठी अशा पद्धतीच्या ओळखीचा अधिक मदत घ्यावी लागली असल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आले.

दिल्‍लीतील ‘लोकल सर्कल’ या संस्थेने देशभरातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा एक ऑनलाइन सर्व्हे केला. त्यात जवळपास 211 जिल्ह्यांतील रुग्णांना आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स नक्‍की कशा पद्धतीने मिळाले, याची माहिती घेण्यात आली. या सर्व्हेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 177 नागरिकांनी सहभाग घेतला. त्यामधील 677 जणांनी त्यांना आलेले अनुभव या सर्व्हेत नोंदविले.  यामधील धक्‍कादायक बाब म्हणजे जवळपास 32 टक्के जणांनी वेगवेगळया माध्यमातून वशिला आणि दबाबतंत्र वापरल्यानंतरच त्यांना बेड्स मिळाले असल्याचे स्पष्ट केले आहे.  तर 44 टक्के नागरिकांना ओळख, वशिला, सोशल मीडिया आणि पाठपुरावा या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर बेड मिळाले असल्याचे म्हटले आहे. याशिवाय 10 टक्के जणांनी पाठपुरावा केल्यानंतर, तर 5 टक्के जणांनी नेहमीच्या पद्धतीने प्रयत्न केल्यानंतर बेड्स मिळाले असल्याचे सांगितले आहे. याशिवाय 3 टक्के जणांनी बेड मिळविण्यासाठी लाच द्यावी लागली असल्याचे आणि 5 टक्के जणांनी सर्व काही करूनही बेड मिळू शकले नसल्याची धक्‍कादायक माहिती दिली आहे.  केवळ 1 टक्के जणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बेड मिळाला असल्याचेही या सर्व्हेतून समोर आले आहे.

इडॅश बोर्डवर बेडची योग्य माहिती मिळावी/इ

रुग्णालयातील रिक्‍त झालेल्या बेड्सची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्‍त स्तरावर डॅश बोर्ड सुरू करण्यात आला आहे. मात्र, त्यावर रुग्णालयांकडून अद्ययावत माहिती दिली जात नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात जाऊनही  बेड न मिळल्याने परत यावे लागले. यासंबंधीच्या सर्व्हेत 504 जणांनी त्यांचे अनुभव मांडले. त्यानुसार 88 टक्के जणांनी डॅश बोर्ड अद्ययावत असले पाहिजे असे म्हटले आहे, तर 10 टक्के जणांनी गरज नसल्याचे म्हटले असून, 2 टक्के जणांनी त्यावर मत व्यक्‍त केलेले नाही.

 "