Sun, Jan 17, 2021 10:58
पुणे: पैजण विकून समुद्र पाहण्यासाठी चार अल्पवयीन मुलींची मुंबई वारी

Last Updated: Jan 12 2021 6:57PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरानामुळे लॉकडाऊन झाल्याने घरातच अडकून पडलेल्या १२ ते १६ वर्षाच्या चार अल्पवयीन मुलींचे मुंबईचा समुद्र किनारा पाहण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांनी पैजण विकून थेट मुंबई गाठल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर अवघ्या चार तासांच्या आत त्या मुलींचा शोध घेऊन मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्या आई वडीलांच्या सुपूर्द केले.

वाचा : पुणे: वाहतूक पोलिसांची सतर्कता, ३ लाखांचा अफू जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील म्हाडा वसाहत परिसरात बारा वर्षाची एक मुलगी, तेरा वर्षांच्या दोन आणि सोळा वर्षाची एक मुलगी अशा चौघी राहतात. तिघीही सध्या शिक्षण घेत असून १६ वर्षाच्या मुलीने तिचे शिक्षण सोडले आहे. त्यांचे आई वडील मोल मजुरी करतात. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने घरातच अडकून पडलेल्या मुलींना मुंबईतील समुद्र किनारा पाहण्याची इच्छा झाली होती. त्यासाठी मागील एक महिन्यापासून त्या मुंबईला कसे जायचे याचा विचार करत होत्या. त्यातच दोन अल्पवयीन मुलींनी आपले पायातील पैजण विकण्याची तयारी दाखविली. त्यांनी शहरात येऊन सोन्या मारूती चौकात पैजण विकले. प्रत्येकीने पैशाची जुळवा जुळव केल्याने त्यांच्याकडे चार ते पाच हजार रूपये जमा झाले. त्यानंतर त्यांनी घरातून बाहेर पडण्याचे ठरले. वेळ साधत त्या चौघीही जीवाची मुंबई करण्यासाठी बॅगा घेऊन रविवारी (दि.१०) दुपारी घराबाहेर पडल्या.

वाचा : बारामतीत वैद्यकिय अधिकारी, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

काही तास गेल्यानंतर चौघीही मुली घरी न आल्याने त्यांच्या आई-वडीलांनी शोधा-शोध सुरू केली. परंतु, रात्री आठ वाजले तरी त्या न आल्याने त्यांनी शेवटी वारजे माळवाडी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याप्रकरणात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक अमृत मराठे यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मुलींकडील असलेल्या मोबाईलचे लोकेशन मिळविले. त्यावेळी त्या चारही मुली वडगाव मावळ परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाला वडगाव मावळ येथे रवाना करण्यात आले. 

वाचा : बारामती : व्याजाच्या वसूलीनंतरही जमीन लाटणाऱ्या सहा सावकारांवर गुन्हा

दरम्यान या मुली मुंबईकडे जात असल्याची शक्यता वाटल्याने वारजे माळवाडी पोलिसांनी मुंबई सीएसटी पोलिस ठाणे, मुंबई नियंत्रण कक्षाला मुलींबाबत माहिती दिली. त्यानंतर मराठे यांनी मुलींचे फोटो आणि वर्णन व्हॉट्स अॅपद्वारे पाठवले. त्यानुसार सीएसटी पोलिसांशी संपर्क साधून तेथील ठाणे अंमलदार सहाय्यक पोलिस फौजदार भुमकर यांना सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी मराठे यांनी दिलेल्या वर्णनानुसार चार मुली पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सीएसटी स्थानकात उतरल्या. त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आणि वारजे माळवाडी पोलिसांना ही माहिती कळवली. यानंतर मराठे यांनी तात्काळ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक एम.एस भोईने व त्यांच्यासोबत पथक मुलींना आणण्यासाठी पाठविले. 

वाचा : सीरमच्या कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीचे देशभरात वितरण सुरु

मुंबईतून मुलींना सुखरूप पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या आई वडीलांच्या हवाली करण्यात आले. यावेळी घाबरलेल्या मुलींच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले. याबाबत पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड व वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांचे मार्गदर्शन मिळाले. 

अशी गाठली मुंबई

घरातून मुंबई गाठण्याचे ठरवल्यानंतर त्या चारही मुलांनी सोन्या मारूती चौकात पायातील पैंजण विकले. त्या पैशातून चारही अल्पवयीन मुलींनी बॅगा खरेदी केल्या आणि त्या घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या स्वारगेट येथून पनवेलला बसने गेल्या. पनवेल येथून दुसर्‍या बसने दादरला गेल्या. त्यानंतर त्या रेल्वेने सीएसटी रेल्वेस्टेशनला गेल्या.  

घटनेतील मुली या लहान होत्या. मुंबईच्या गर्दीत मुली हरविल्या असत्या किंवा कोणत्याही समाजकंटकाच्या हाती लागल्या असत्या तर त्यांचा शोध घेणे कठीण झाले असते. यामुळे आई-वडीलांनी आपल्या पाल्यांकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या हौसे मौजेचाही विचार त्यांनी केला पाहिजे. जेणे करून असे प्रसंग पालकांसमोर उद्भवानार नाही.
- अमृत मराठे, गुन्हे निरीक्षक, वारजे माळवाडी पोलिस ठाणे