Mon, Sep 28, 2020 07:44होमपेज › Pune › ...तर प्रचारासाठी कार्यकर्तेही बाहेरून आणा

...तर प्रचारासाठी कार्यकर्तेही बाहेरून आणा

Published On: Mar 14 2019 2:05AM | Last Updated: Mar 14 2019 1:25AM
पुणे, प्रतिनिधी :

निवडणुकीसाठी बाहेरचा उमेदवार आणणार असाल, तर प्रचारासाठी कार्यकर्तेही बाहेरचेच आणा; असा सज्जड दमच काँग्रेस पदाधिकार्‍यांनी बुधवारी दिला. त्यामुळे आता आयात उमेदवाराला काँग्रेसजनांचा विरोध कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

काँग्रेसच्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या प्रचार समितीची बैठक पुण्यातील काँग्रेस भवनात झाली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष उल्हास पवार यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रवक्‍ते रत्नाकर गायकवाड, आमदार रामहरी रूपनवार, प्रकाश आवाडे, शहराध्यक्ष रमेश बागवे, जिल्हाध्यक्ष संजय जगताप आदी उपस्थित होते. या बैठकीत पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. 
काँग्रेसकडून उमेदवारीसाठी भाजपचे सहयोगी सदस्य, खासदार संजय काकडे व प्रवीण गायकवाड या आयात उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. हा धागा पकडत काही पदाधिकार्‍यांनी त्यावर नाराजी व्यक्‍त केली. पक्षामध्ये निवडून येण्याची क्षमता असतानाही दुर्दैवाने बाहेरील उमेदवाराच्या नावाची चर्चा होते. जो इच्छुक उमेदवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर करतो, तोच संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना भेटतो. त्यामुळे काँग्रेसला फसविण्याचा हा भाजपचा डाव आहे. या इच्छुकामागे एकही नगरसेवक भाजपमधून येणार नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षाला ते इच्छुकाचे एवढे काय पडलेय, असा प्रश्‍नही काही काँग्रेस पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला.

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर नाराजी

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी केलेल्या भाजप प्रवेशावरही या बैठकीत नाराजी व्यक्‍त करण्यात आली. काँग्रेसच्या अडचणीच्या काळात नेते मंडळींच्या मुलांनी असा निर्णय घेणे योग्य नसल्याचे मत काही पदाधिकार्‍यांनी व्यक्‍त केले.