Wed, May 19, 2021 05:36होमपेज › Pune › पिंपरी : बहिणीने प्रेमविवाह केल्याने गुंडांचा राडा; नंग्या तलवारी नाचवत वाहनांची तोडफोड

पिंपरी : बहिणीने प्रेमविवाह केल्याने गुंडांचा राडा; नंग्या तलवारी नाचवत वाहनांची तोडफोड

Last Updated: Oct 28 2020 11:25AM
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग आल्याने एका सराईत गुंडाने नंग्या तलवारीचा नाच करीत रस्त्यावरील दहा ते बारा वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (२७) रात्री वेताळनगर, चिंचवड येथे घडली. या घटनेमागे दोन टोळीतील वर्चस्ववादाची किनार असल्याचेही बोलले जात आहे. 

आण्णा ऊर्फ ओंकार हजारे, ओंकार कसबे, मल्हारी दभडगे, आदित्य फाळके, लखन डोंगरे, भैय्या उर्फ तेजस वायदंडे व इतर दोन ते तीनजण (सर्व रा. वेताळनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी स्वानंद चंद्रकांत कांबळे (२०, रा.- वेताळनगर, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

अधिक वाचा : प्रेम विवाह केल्याने चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हजारेच्या बहिणीने प्रथमेश हिरेमठशी प्रेमविवाह केला आहे. या रागातून आरोपींनी आपसात संगनमत करून हातात तलवारी, कोयते घेऊन तसेच दगडफेक करत चिंचवड गावातील वेताळनगर परिसरात वाहनांची तोडफोड केली. तोडफोडीच्या या घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

अधिक वाचा : ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतूक दरात वाढ

 

"आमचे नुकसान भरून द्या, आरोपींना त्वरित अटक करा", अशी मागणी या वेळी संतप्त नागरिकांनी केली. कुख्यात गुंड रणजीत चव्हाण गँग आणि मामा गँग यांच्या वर्चस्व वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. या घटनेची दखल घेत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला वायरलेसवरूनच सुनावले. अशी गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी सर्व पोलीस निरीक्षकांना दिला.