Tue, Sep 29, 2020 20:32होमपेज › Pune › पुण्यात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्‍त अधिक 

पुण्यात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्‍त अधिक 

Last Updated: Aug 04 2020 1:47AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात आज कोरोनाचे 1529 नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये पुणे शहरातील 781, तर पिंपरी चिंचवडमधील 748 रुग्णांचा समावेश आहे. त्याप्रमाणेच पुणे शहरात 18 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 20 अशा एकूण 38 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दरम्यान नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज जास्त होती. दिवसभरात 2249 जणांना घरी सोडण्यात आले. दोन्ही शहरात रुग्णसंख्या घटल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. 

पुणे शहरात सोमवारी ‘आरटीपीसीआर’ व ‘अँटिजेन’ चाचणीसाठी  4,604 संशयितांचे नमुने घेण्यात आले. तर आतापर्यंत 2 लाख 86 हजार 444 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याआधी घेतलेल्या नमुन्यांपैकी 781 नमुने (रुग्ण) आज पॉझिटिव्ह आढळले; तर आतापर्यंत 58,303  नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचबरोबर दिवसभरात 1,822 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत  कोरोनातून बरे झालेल्या 39,939 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 16,981 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सूरू आहेत. त्यापैकी 633 रुग्ण गंभीर असून, 389 अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

उपचारादरम्यान सोमवारी पुणे शहरात 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी 13 पुरुष, तर 5 महिला आहेत. या मृतांचे वय 45 ते 94  च्या दरम्यान होते. हे रुग्ण शुक्रवार पेठ, वारजे, सदाशिव पेठ, कोथरूड, वानवडी, हडपसर, उंद्री, कोंढवा, फुरसुंगी, लोहेगाव, वडगाव शेरी, बालेवाडी, मोहम्मदवाडी, जनता वसाहत, कळस आणि शनिवार पेठ येथील रहिवासी होते. त्यापैकी काहींना जोखमीचे आजार होते. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 1384 वर पोचली आहे.

पिंपरी-चिंवड शहरात कोरोनाचे 748 नवे रुग्ण आढळले असून, येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 23,998 झाली आहे. सध्या सक्रिय असलेल्या 3,895 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 770 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. कोरोनातून बरे झालेल्या 727 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्यांची संख्या 16,206 झाली आहे. तसेच 427 जणांना क्‍वारंटाईन करण्यात आले. सोमवारी भोसरी, दापोडी, सांगवी, पिंपरी, पिंपळे गुरव, थेरगाव, काळेवाडी, फुगेवाडी, निगडी, माण, फुरसुंगी येथील 20 जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील एकूण मृतांची संख्या 489 झाली आहे. 

 "