Wed, Oct 28, 2020 11:28होमपेज › None › चीनच्या लॅबमध्ये मानवनिर्मित कोरोना

चीनच्या लॅबमध्ये मानवनिर्मित कोरोना

Last Updated: Sep 17 2020 8:21AM
न्यूयॉर्क ः वृत्तसंस्था

चीनमधून अमेरिकेत जाऊन आश्रय घेतलेल्या महिला विषाणू शास्त्रज्ञाने कोरोना विषाणू नैसर्गिक नसून तो चीनमधील प्रयोगशाळेत तयार केलेला ‘मानवनिर्मित विषाणू’ असल्याचा दावा केला होता. आता डॉ. ली-मेंग यान नावाच्या या विषाणूतज्ज्ञ महिलेने आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी काही पुरावे सादर केले आहेत. 

त्यानुसार जगभर सध्या धुमाकूळ घालत असलेला नवा कोरोना विषाणू ‘सार्स-कोव्ह-2’ हा दोन वटवाघळांच्या जनुकीय सामग्रीला मिसळून बनवला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र हा दावा अनेक वैज्ञानिकांनी फेटाळून लावला आहे.

कोरोना विषाणू मानवनिर्मित असावा, असा संशय सुरुवातीपासूनच घेतला जात होता. चीनची लपवाछपवी आणि या देशाचा आजपर्यंतचा बेरकीपणा यामुळेच असा संशय जगाला येत होता. डॉ. यान यांच्यासारख्या चिनी व्हायरॉलॉजिस्टनेही तसाच दावा केल्याने हा संशय अधिक बळावला होता. आता डॉ. यान यांनी कोरोना विषाणूबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

हाँगकाँगच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये सुरू असलेल्या संशोधनादरम्यान यान यांनी कोरोना विषाणूचा अभ्यास केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूचे स्पाईक प्रोटिन बदलण्यात आले आहेत. त्यामुळे मानवी पेशींमध्ये ते सहजपणे घुसून आपले संक्रमण फैलावू शकतात. 

अर्थात यान यांच्या दाव्यावर अनेक वैज्ञानिकांनी प्रश्‍नचिन्हही उपस्थित केले आहे. अनेकांनी याबाबत मौनच बाळगले आहे. हा विषाणू माणसाने विकसित केल्याचे कोणतेही पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत, असे यापूर्वीच्या शोधपत्रांमध्ये म्हटले होते. हा विषाणू वटवाघळांसारख्या जीवांमधून मनुष्यात आला असावा, असेच दिसत असल्याचे सांगण्यात आले. 

मात्र हा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतूनच आला असल्याचे डॉ. यान सुरुवातीपासून रेटून सांगत आहेत. आता त्यांनी जे ‘पुरावे’ दिले आहेत, ते कोणत्याही वैज्ञानिक नियतकालिकाने प्रकाशित केलेले नाहीत किंवा त्यांची वैज्ञानिकांनी तपशीलवार समीक्षा किंवा अभ्यासही केलेला नाही. कुणी या पुराव्यांना अधिकृत स्वीकृतीही दिलेली नाही.
 

 "