Thu, Oct 01, 2020 23:20होमपेज › None › ...तर कोरोना बाधितांची संख्या असती ७० लाखांच्या घरात!

...तर कोरोना बाधितांची संख्या असती ७० लाखांच्या घरात!

Last Updated: May 22 2020 7:00PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशव्यापी लॉकडाउनचा निर्णय योग्यवेळी घेण्यात आला नसता, तर देशात आतापर्यंत ७० लाखांच्या घरात कोरोनाबाधितांची संख्या असती, असा धक्कादायक दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा सामूहिक फैलाव तसेच मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यात यश मिळाले आहे, असे मत अधिकारप्राप्त समुह-१ चे अध्यक्ष डॉ. बी. के. पॉल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून दिली. 

२५ मार्चला पहिल्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. पंरतु, ३ एप्रिल पर्यंत रूग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली. ही वाढ जवळपास २२.०६ टक्के एवढी होती. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी त्याचा वेग नियंत्रणात येणे आवश्यक होते. ४ एप्रिल नंतर कोरोनाचा वेग मंदावला. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या २० दिवसांच्या काळात रूग्णसंख्या वाढीचा वेग हा ५.०५ टक्क्यांपर्यंत आला. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वाढता आलेख देशाने रोखला. 

कोरोनाबाधितांचा वाढीचा आलेख सुरुवातीच्या १५ ते २२ टक्क्यांच्या घरात असता तर रूग्णसंख्या बरीच जास्त असती. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये रूग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर ३.४ दिवस होता. आता दर १३.०३ दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट होत आहे. लॉकडाऊन दरम्यान ५ ​एप्रिल नंतर मृत्यूदरात घट झाली. लॉकडाऊन पूर्वीच्या आणि लॉकडाऊन दरम्यानच्या स्थितीत बरेच अंतर दिसून आले आहे. कोरोनाचा फैलावाचा वेग नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचे त्यावरून दिसून येत असल्याचे पॉल म्हणाले.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत १९ मे पर्यंत १ कोटी रूग्णांवर उपचार करण्यात आले. देशाच्या वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात ही योजना मैलाचा दगड ठरत आहे. १४ हजार हेल्थ अँड वेलनेस सेंटर तयार करण्यात आले असून अजून त्यात भर पडेल. सार्व​जनिक आरोग्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊनमुळे महारोगराईला नियंत्रणात ठेवण्यास तयारी पूर्ण करण्यास वेळ मिळाला आहे. 

देशाने विचारपूर्वक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला. अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय उशिराने घेतला. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. लॉकडाऊनच्या निर्णयाला मात्र देशवासियांनी सकारात्मकतेने घेतला, असे ही ते म्हणाले.

स्वतंत्र तज्यांच्या अभ्यासानूसार

लॉकडाऊनमुळे जवळपास २३ लाख नागरिकांना कोरोनापासून वाचवण्यात यश मिळाले आहे. वेळीच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला नसता, तर आतापर्यंत देशात तब्बल ६८ हजार मृत्यू झाले असते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सांख्यिका मंत्रालयातील निवृत्त तज्ञांनी केलेल्या पाहणीनूसार जवळपास १५.९ लाख नागरिकांना कोरोनाची लागण होण्यापासून बचाव करण्यात आला, तर ५१ हजार नागरिकांचे जीव वाचले. भारतीय सांख्यिकी संस्थेनुसार २० लाख कोरोनाबाधित तसेच ५४ हजार मृत्यू लॉकडाऊनमुळे रोखण्यात यश मिळाले आहे.

८० टक्के रूग्ण केवळ पाच राज्यात

महारोगराई नियंत्रणात ठेवण्यासह लाखो नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. लॉकडाऊनमुळे कमीत कमी नागरिकांपर्यंत कोरोना पोहोचला. सुरुवातीच्या दिवसांमध्ये २० लाख रूग्ण आढळले असते, तर त्यांच्यामुळे उर्वरित नागरिकांमध्येही संसर्ग वाढला असता. केवळ मोजक्याच ठिकाणी कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे. २१ मे पर्यंत ८० टक्के कोरोनाबाधित देशातील केवळ पाच राज्यात नोंदवण्यात आले. तर, ९० टक्के रूग्ण १० राज्यात, शहारनिहाय वर्गीकरण केले असता ६० टक्के रूग्ण ५ , तर ७० टक्के रूग्ण १० शहांमध्येच आढळून आले आहेत. 

मृत्यूदराचा विचार केला तर, ८० टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ५ , तर ९५ टक्के मृत्यू १० राज्यात झाले. शहरनिहाय तुलना केल्यास ६० टक्के मृत्यू ५ शहरांमध्ये, तर ७०  टक्के मृत्यू १० शहरांमध्ये झाल्याची स्पष्टोक्ती पॉल यांनी दिली. राज्यांना आतापर्यंत ३० लाख वैयक्तिक सुरक्षा उपकरण पीपीई देण्यात आले आहेत. देशांतर्गत १०९ कंपन्यांमध्ये त्यांचे उत्पादन घेण्यात येत आहे. दरदिवशी ३ लाख पीपीईचे उत्पादन घेण्यात येत आहे. देशातील व्हेंटिलेटरची उणीवही कमी केली जात आहे, असेही ते म्हणाले.

 "