Mon, Apr 12, 2021 02:44
देशातील X, Y, Z, Z+ सुरक्षा म्हणजे काय रे भाऊ? त्याची रचना कशी असते

Last Updated: Feb 26 2021 6:13PM

पुढारी ऑनलाईन डेस्क

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळून आल्याने एकूणच अशा अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यानिमित्ताने देशातील अशा महत्वाच्या व्यक्तींसाठी नेमकी कोणती सुरक्षा पुरवली जाते आणि त्यांचे कोणते प्रकार आहेत हे यानिमित्ताने आपण जाणून घेऊया. 

भारतात अतिमहत्वाच्या व्यक्तींना नेहमी अत्यंत उच्च दर्जाची आणि सक्षम अशी सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. अतिमहत्वाच्या व्यक्तींना ही अशी सुरक्षा पुरविण्याची मुख्य जबाबदारी हे केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत पार पाडली जाते. या एकूणच सुरक्षा व्यवस्थेत स्पेशल कमांडो, एनएसजी जवान आणि स्थानिक पोलीस यांचा समावेश असतो. तसेच या जवानांकडे उच्च दर्जाचे शस्त्र आणि तसाच पोशाख असतो. या सर्व सुरक्षा व्यवस्थांमध्ये एनएसजी,दिल्ली पोलीस,आयटीबीपी जवान,सीआरपीएफ जवान आणि स्थानिक पोलीस अधिकारी यांचा समावेश असतो.

भारतात अशा विशेष सुरक्षा व्यवस्थेचे एकूण ५ प्रकार आहेत. X, Y, Z, Z+ आणि एसपीजी(स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) असे हे पाच प्रकार आहेत.आता जाणून घेऊया प्रत्येक सुरक्षा प्रकाराची संरचना आणि ती कोणकोणत्या लोकांना पुरवली जाते.

- X सुरक्षा 

या सुरक्षा व्यवस्थेत २ किंवा ५ सशस्त्र पोलीस अधिकारी तैनात असतात. मुख्यत्वे हे सर्व पोलीस अधिकारी हे राज्य शासनाचे असतात.यात एक वैयक्तिक सुरक्षा अधिकारी असतो. यामध्ये कोणत्याही कमांडोंचा समावेश नसतो. सदरची सुरक्षा व्यवस्था ही काही ठराविक क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींना पुरवली जाते. 

- Y सुरक्षा 

यामध्ये एकूण ११ पोलिसांचा समावेश असतो. त्यात १ किंवा २ विशेष कमांडो यांचा सहभाग असतो. सदर सुरक्षा ही सुद्धा काही ठराविक व्यक्तींना देण्यात येते. 

-  Z सुरक्षा 

यामध्ये एकूण २२ जवानांचा समावेश आहे. यात ४ ते ५ एनएसजी कमांडो असतात आणि उर्वरित सर्व पोलीस अधिकारी असतात. सदर सुरक्षा ही काही महत्वाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना, खेळाडू आणि मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते- अभिनेत्री यांना पुरवली जाते. 

- Z प्लस सुरक्षा 

ही सर्वात प्रथम दर्जाची आणि उच्च सुरक्षा मानली जाते.यात एकूण ५५ सुरक्षा जवानांचा समावेहस असतो. यातील १० जवान हे एनएसजी कमांडो असतात आणि उर्वरित पोलीस अधिकारी असतात.एनएसजी कमांडो हे अत्याधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा गॅझेट सज्ज असतात. भारतातील केवळ १० ते १५ अतिमहत्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. सध्या गृहमंत्री अमित शहा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आदींना ही सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. तर अतिमहत्वाच्या व्यक्तींमध्ये देशातील नावाजलेले उद्योगपती सुद्धा आहेत. मुकेश अंबानी यांना सुद्धा हीच सुरक्षा प्रदान केली आहे.

- एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप)

एप्रिल १९८५ मध्ये स्थापित झालेल्या या सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थेत सध्या ३ हजाराहून अधिक सुसज्ज कमांडो तैनात आहेत.सध्या देशात केवळ पंतप्रधांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ही सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. अत्यंत उच्च दर्जाची शस्त्रे आणि अत्याधुनिक यंत्रणा यांनी हे जवान सुसज्ज असतात.कोणत्याही बिकट परिस्थितीचा सामना करण्याकरिता हे जवान तत्पर असतात.