Sat, Aug 15, 2020 13:01होमपेज › National › गेल्या १२ वर्षात प्रथमच मान्सूनची धीम्या गतीने वाटचाल!

बारा वर्षात प्रथमच मान्सूनची धीम्या गतीने वाटचाल!

Published On: Jun 19 2019 8:35AM | Last Updated: Jun 19 2019 11:55AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

यंदा मान्सूनचे आगमन लांबले. त्याला वायू चक्रीवादळ देखील कारणीभूत आहे. मॉन्सून अद्याप दक्षिण भारतातच आहे. त्याचा वेग मंदावला आहे. गेल्या १२ वर्षात प्रथमच मॉन्सूनची धीम्या गतीने वाटचाल राहिली आहे, असे भारतीय हवामान विभागाकडील नोंदीनुसार दिसून आले आहे.

सर्वसाधारणपणे दरवर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून देशाचा दोन तृतीयांश भाग व्यापतो. मात्र, यंदा आतापर्यंत मान्सूनने केवळ देशाचा १० ते १५ टक्के भाग व्यापलाय. मान्सूनची गती मंदावल्याने देशभरात जूनमध्ये होणाऱ्या पावसात ४४ टक्के तूट नोंदविण्यात आली आहे.

देशात २०१३ मध्ये मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने झाली होती. या वर्षी मान्सूनने १६ जून पर्यंत संपूर्ण देश व्यापला होता. मान्सूनने आतापर्यंत केरळ, कर्नाटकचा दक्षिण भाग, तामिळनाडूचा दोन तृतीयांश भाग आणि ईशान्य भारताचा बहुतांश भाग व्यापला आहे. पुढील तीन-चार दिवसांत मान्सून कोकण आणि गोव्यात पोहोचेल. तर २५ जूनपर्यंत मान्सून दक्षिण भारताचा संपूर्ण भाग, महाराष्ट्र आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मान्सूनचे आगमन लांबल्याने महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य भारताच्या काही भागात पाण्याची टंचाई तीव्र बनली आहे. या भागातील धरणे आटत असून एकूण क्षमतेच्या केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. शेती संकटात आली आहे. यामुळे शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पहात आहे.