Tue, Sep 29, 2020 09:17होमपेज › National › सोनिया गांधी, सीएम गेहलोतांमध्ये मन की बात; निलंबित आमदार गेहलोतांच्या भेटीला

सोनिया गांधी, सीएम गेहलोतांमध्ये मन की बात; निलंबित आमदार गेहलोतांच्या भेटीला

Last Updated: Aug 10 2020 8:31PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

राजस्थानात जवळपास महिनाभर चाललेले राजकीय नाराजी नाट्य संपण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी आज (दि. 10) चर्चा केली. यावरुन राज्यातील राजकीय संकटावर तोडगा काढण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसते. या आठवड्यात विधानसभा सत्र बोलावण्यात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर या सर्व घडोमोडींना वेग आला आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सोनिया गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यात चर्चा झाली. दुसरीकडे निलंबित आमदार भवरलाल शर्मा जे पायलट यांचे समर्थक समजले जातात त्यांनी गेहलोतांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेहलोतांनी सोनिया गांधी यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोस्तारा आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने एक समिती स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय गेहलोतांना मान्य असल्याचे सांगितले. 

सुत्रांकडून कळालेल्या माहितीनुसार सचिन पायलट यांनी त्यांच्या गटाच्या दोन माजी मंत्र्यांना पुन्हा एकदा कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात यावे असा आग्रह धरला आहे. दरम्यान, भवरलाल शर्मा यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोतांचीही भेट घेतली. 

पक्षाने शर्मा आणि आमदार विश्वेंद्र सिंह यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व पदावरुनही निलंबित केले आहे. त्यांच्यावर गेहलोत सरकार पाडण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच शर्मा यांच्याविरुद्ध कथित ऑडिओ टेपच्या आधारे एफआयआर देखील दाखल केली गेली आहे. 

दरम्यान, आज सकाळी पायलट यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वायनाडच्या खासदारांच्या घरी झालेली ही बैठक यशस्वी ठरली असून यातून चांगले फलित बाहेर येण्याची शक्यता आहे. पायलट आणि त्यांच्या समर्थकांना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचे गेहलोत सरकार बरोबरचे मतभेद पक्षाकडून सोडवले जातील असे सांगण्यात आले आहे.  

 "