Tue, Mar 02, 2021 10:54होमपेज › National › ‘नगरोटा’नंतर भारत आक्रमक!

‘नगरोटा’नंतर भारत आक्रमक!

Last Updated: Nov 22 2020 1:33AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नगरोटा एन्काऊंटरनंतर दोन दिवसांनी शनिवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्‍त कार्यालयातील अधिकार्‍यांना पाचारण केले आणि धारेवर धरले. पाकिस्तानने दहशतवाद्यांची पाठराखण करणे त्वरित थांबवावे. पाकिस्तानला दहशतवाद्यांनी आपले आश्रयस्थळ करून सोडलेले आहे. पाकिस्तानच्या भूमीवरूनच अन्य देशांतील दहशतवादी कारवाया पार पडल्या जात आहेत. नगरोटातील घटना ही त्याचा मोठा पुरावा आहे. पाकिस्तान सरकारने त्यांच्या जमिनीवरून दहशतवाद्यांचा सफाया केला, तर कुणालाही तेथे एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक, पिनपॉईंट स्ट्राईक करण्याची गरज भासणार नाही, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने पाक उच्चायुक्‍त कार्यालयातील अधिकार्‍यांना फटकारले.

मारले गेलेले दहशतवादी हे ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते, ही बाब नगरोटा घटनेच्या तपासाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाली आहे. ‘जैश’नेच 2019 मध्ये पुलवामातील हल्ला घडवून आणला होता. भारतातील किती तरी दहशतवादी घटनांमागे ही संघटना आहे. नगरोटातील दहशतवाद्यांकडून जे जे काही हस्तगत करण्यात आलेले आहे, त्यातून हे स्पष्ट दिसते की, जम्मू-काश्मीरमधील निवडणूक प्रक्रियेत त्यांना हिंसाचार घडवून आणायचा होता, असेही परराष्ट्र मंत्रालयाने पाक उच्चायुक्‍तांना सांगितले.

मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या स्मृतिदिनी तशाच प्रकारचा दहशतवादी हल्ला भारतामध्ये घडवून आणण्याची ‘जैश’च्या मारल्या गेलेल्या या दहशतवाद्यांची योजना होती.

पाकिस्तानातच मिळाले मोबाईल

गुप्‍तचर यंत्रणांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना सीमापार करण्यापूर्वी पाकिस्तानातच मोबाईल उपलब्ध करून देण्यात आलेले होते. भारताच्या हद्दीत दाखल झाल्यानंतर दहशतवाद्यांना एक स्थानिक गद्दार वाटाड्या जम्मू-दिल्ली महामार्गावर घेऊन आला. इथूनच दहशतवाद्यांना तांदळाने भरलेल्या ट्रकमध्ये बसविण्यात आले. तपास यंत्रणा वाटाड्याचा शोध घेत आहेत.

दहशतवादी भुयारी मार्गाने दाखल

पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरीसाठी भुयारी मार्गाचा वापर केलेला असण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे. हे दहशतवादी पाकिस्तानातील शक्‍करगडहून भुयारी मार्गाने सांबा सेक्टरमध्ये आले होते. त्यांच्याकडून जप्‍त करण्यात आलेली शस्त्रे आणि दारूगोळ्याची साठवणूक ट्रकमध्ये आधीपासूनच करून ठेवलेली असावी, असाही यंत्रणांचा अंदाज आहे. सीमेवर तार फेंसिंगसोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही. म्हणूनच दहशतवादी भुयारी मार्गानेच दाखल झाल्याचे मानले जात आहे. 

आमच्या जवानांनी पुन्हा एकदा मर्दुमकी दाखविलेली आहे. देशात मोठा घातपात घडवून आणण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या धाडसाने उधळून लावला आणि आपले नैपुण्य सिद्ध केले आहे. मी यंत्रणांच्या या सतर्कतेला धन्यवाद देतो. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पाकिस्तानी ‘हँडलर’कडून मेसेज
      * नगरोटात मारल्या गेलेल्या चारही दहशतवाद्यांशी पाकिस्तानातील ‘हँडलर’ संपर्क ठेवून होता. दहशतवादी या ‘हँडलर’शी मोबाईलवरून चॅट करत होते (बोलत होते), ही बाब दहशतवाद्यांकडून जप्‍त करण्यात आलेल्या मोबाईल फोनच्या तपासणीअंती स्पष्ट झाली आहे. पाकिस्तानातूनच या दहशतवाद्यांना निर्देश दिले जात होते, हेही स्पष्ट झालेले आहे. 
     * सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांकडून जप्‍त केलेले मोबाईल हे पाकिस्तानात तयार झालेल्या एमपीडी-2505 मॉडेल आहेत. त्यात सिमकार्डही पाकिस्तानातील आहेत. जप्‍त मोबाईल हे अँड्रॉईड फोन नाहीत. केवळ टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून संदेशांचे आदानप्रदान झालेले आहे.