Thu, Oct 01, 2020 18:34



होमपेज › National › 'गायीचे नाव घेतल्यास अनेकांना शॉक लागतो'

'गायीचे नाव घेतल्यास अनेकांना शॉक लागतो'

Published On: Sep 11 2019 6:27PM | Last Updated: Sep 11 2019 6:27PM




मथुरा : पुढारी ऑनलाईन

कृष्‍णनगरी मथुरेत आज (ता.११) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्‍त्र सोडले. 'ॐ' शब्‍द ऐकताच काही लोकांचे कान टवकारले जातात. तसेच गाय शब्‍द कानावर पडताच काही लोकांचे केस उभे राहतात, जणू त्‍यांना करंट बसतो असे ते म्‍हणाले. त्‍यांना वाटते देश १६ ते१७व्या शतकात गेला आहे. अशा लोकांनीच देशाला उद्ध्वस्त केल्‍याची टीका मोदी यांनी यावेळी केली.

अमेरिकेवर झालेल्‍या ९/११ च्या हल्‍ल्‍याचा उल्‍लेख करत, पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद ही एक जागतिक समस्‍या आहे. दहशतवाद एक विचारधारा झाली आहे. दहशतवादामुळे आमच्या शेजारीच वाढत आहेत. अशांशी आम्‍ही धीराने सामना करत आहोत आणि पुढेही करत राहू असे मोदी म्‍हणाले. तसेच दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या आणि त्‍यांना प्रशिक्षण देणार्‍या विरोधात कारवाई करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे. ते आम्‍ही करून देखील दाखवले आहे असेही त्‍यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी पुढे म्‍हणाले, या वर्षी २ ऑक्‍टोबरपर्यंत आपले घर, आपले कार्यालय, आपल्‍या कार्यक्षेत्राला प्लॉस्‍टिक मुक्‍त करा. आज स्‍वच्छता हीच सेवा या अभियानाला सुरूवात झाली आहे. राष्‍ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमही लॉन्च केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. महात्‍मा गांधींचे हे १५० वे प्रेरणा वर्ष आहे. आजपासून सुरू होणार्‍या या अभियानाला यावेळी प्रामुख्याने प्लॅस्‍टिक मुक्‍त कचरा म्हणून समर्पित केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 

पंतप्रधान म्‍हणाले ब्रजभूमीने नेहमीच सर्व जगाला आणि मानवतेला प्रेरित केले. आज सगळे जग पर्यावरण संरक्षणासाठी एक आदर्शाच्या शोधात आहे. मात्र, भारताकडे श्रीकृष्‍णासारखे प्रेरणास्‍त्रोत नेहमीच राहिले आहेत. ज्‍याची कल्‍पनाच पर्यावरण प्रेमाविना अपूरी आहे. प्रकृती, पर्यावरण आणि पशुधानाविना आपले आराध्य दैवत जितके अपुरे दिसतील, तितकाच अपुरेपणा आपल्‍याला भारतातही जाणवेल.

१०० दिवसांमध्ये आम्‍ही अभूतपूर्व काम करून दाखवले...

पंतप्रधान मोदी यांनी पुढे बोलताना नव्या जनादेशानंतर कृष्‍णाच्या नगरीत येण्याचे भाग्‍य मिळाले आहे. यावेळी उत्‍तर प्रदेशचा आशिर्वाद मला आणि माझ्‍या सहकाऱ्यांना मिळाला आहे. तुमच्या सर्वाच्या आदेशाने आम्‍ही गेल्‍या १०० दिवसांमध्ये अभूतपूर्व काम करून दाखवले आहे. मला विश्वास आहे की, देशाच्या विकासात तुमचे समर्थन आणि आशिर्वाद आम्‍हाला यापुढे मिळत राहिल. 

दरम्‍यान, यावेळी उत्‍तर प्रदेशच्या मथुरेत नरेंद्र मोदी यांनी दुभत्या जनावरांना आजारातून मुक्‍त करण्यासाठी तयार केलेल्‍या १३,५०० कोटी च्या लसीकरण योजनेचा शुभारंभ केला. मोदी यांनी या कार्यक्रमाची सुरूवात गोसेवेव्दारे केली. तसेच मोदी यांनी यावेळी सिंगल यूज प्लास्‍टिक च्या विरोधातील मोहिमेला ही लॉन्च केले.