Wed, May 19, 2021 04:58होमपेज › National › पाकचा मोठा कट! सांबा सेक्टरमध्ये आढळले भुयार

पाकचा मोठा कट! सांबा सेक्टरमध्ये आढळले भुयार

Last Updated: Nov 23 2020 1:59AM
जम्मू : वृत्तसंस्था

भारतीय सुरक्षा यंत्रणांतील अधिकार्‍यांनी जम्मूतील सांबा सेक्टरमध्ये पाकच्या हद्दीतून भारतीय हद्दीपर्यंत खणण्यात आलेल्या एका भुयाराचा छडा लावला आहे. अर्थात, अद्याप याबाबत कुठलेही अधिकृत वक्तव्य भारतीय सैन्याकडून जारी करण्यात आलेले नाही.

नगरोटा येथे एन्काऊंटरमध्ये मारले गेलेले चारही दहशतवादी देशात 26/11 हल्ल्याप्रमाणे हल्ला घडविण्याच्या तयारीत होते. हे दहशतवादी पाकिस्तानातून भुयारी मार्गाने भारतीय हद्दीत दाखल झाले होते, असा सुरक्षा यंत्रणांचा कयास होता. सांबा सेक्टरमध्ये आढळून आलेल्या भुयाराचा वापर या दहशतवाद्यांनी केला असण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. 

सांबा सेक्टरमधील या भुयाराच्या परिसरात जम्मू-काश्मीर पोलीस तसेच सीमा सुरक्षा दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहेत. हे भुयार रिगाल परिसरात आढळलेले आहे. शुक्रवारी सायंकाळी 6 वा.च्या सुमारास पाकिस्तानच्या दिशेने 2 ड्रोन आंतरराष्ट्रीय सीमा पार करून भारतीय हद्दीत दाखल झाले होते. भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ते पाडण्यासाठी तोफगोळ्यांचा माराही केला; पण ड्रोन माघारी वळून निसटण्यात यशस्वी झाले होते, असेही सांगण्यात येते. या घटनेनंतर रिगाल परिसरात सतर्कता वाढविण्यात आली.

जवानांनी परिसराची पाहणीही सुरू केली. पाहणीदरम्यानच भुयार आढळून आले. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न करण्यात येतो आणि भारतीय जवान तो हाणून पाडतात. भुयाराकडेही पाकच्या या नापाक प्रयत्नांचाच एक भाग म्हणून पाहिले जात आहे.