Sat, Aug 08, 2020 13:50होमपेज › National › 'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)

'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)

Published On: Jul 22 2019 2:44PM | Last Updated: Jul 22 2019 4:14PM
श्रीहरिकोटा : पुढारी ऑनलाईन

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज (ता.२२) ऐतिहासिक कामगिरी करत ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण केले. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने अवकाशात झेप घेतली.

विशेष आणि गौरवाची बाब म्हणजे पुर्वनियोजित वेळेनुसारच चांद्रयान ६ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. यापूर्वी १५ जुलै रोजी आलेल्या तांत्रिक कारणामुळे चांद्रयान-२ प्रक्षेपणाची वेळ आज निश्चित करण्यात आली. त्यामुळे झालेल्या उशिराचा यान उतरण्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी इस्रोच्या टीमने घेतली. 

चांद्रयान-२ चे भारताचे सर्वांत शक्तिशाली रॉकेट जीएसएलव्ही एमके-३ द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. प्रेक्षपणानंतर काही वेळातच चांद्रयान-२ पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले. हे १६ दिवस पृथ्वीच्या कक्षेत परिक्रमा करत चंद्राच्या दिशेने प्रवास करेल. 

इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रेक्षपण झाल्याचे जाहीर केले. ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रेक्षपण झाल्याबद्दल मला आनंद होत आहे, असे त्यांनी म्हटले. या यशस्वी मोहिमेबद्दल सिवन यांनी इस्रोच्या टीमचे अभिनंदन केले.

चंद्रावरील पाणी, खडक, खनिज संपत्ती आदी विविध बाबींचा खजिना मानवजातीसाठी ‘चांद्रयान-२’ मोहिमेतून उपलब्ध होणार आहे. या यानास चंद्रावर पोहोचण्यासाठी साधारणत: ४८ दिवसांचा कालावधी लागणार आहे. या यानाचे वजन ३,८५० किलोग्रॅम आहे. या मोहिमेसाठी ९७८ कोटी खर्च आला आहे. चंद्राच्या दक्षिण धुव्रावर यान उतरवून ‘इस्रो’ विक्रम करणार आहे. चंद्रावर यान उतरविल्यास अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश बनणार आहे. 

१५ जुलै रोजी ‘चांद्रयान-२’च्या प्रक्षेपणात तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे याचे प्रक्षेपण पुढे ढकलले होते. तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. ‘चांद्रयान-२’ हे चंद्रावर अधिक वेगाने जाणार आहे.

पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर ३ लाख ८४ हजार किलोमीटर आहे. चांद्रयान-२ द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जाणार आहेत. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोव्हर 'विक्रम' उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून वेगळे  होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल आणि ज्या ठिकाणी उतरायचे आहे त्या ठिकाणचे स्कॅनिंग सुरू होईल. त्यानंतर ६ ते ७ सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. 

update : 

- ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रेक्षपण झाल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे- डॉ. के. सिवन, अध्यक्ष इस्रो

-‘चांद्रयान-२’ची प्रगती योग्य दिशेने

-चांद्रयान आता १६ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार  

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने अवकाशात झेप घेतली