Sat, Aug 15, 2020 12:34होमपेज › National › माजी आयपीएस संजीव भट्टना जन्मठेप

माजी आयपीएस संजीव भट्टना जन्मठेप

Published On: Jun 20 2019 1:17PM | Last Updated: Jun 20 2019 1:52PM
जामनगर : पुढारी ऑनलाईन

जामनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्यासह पोलिस अधिकारी प्रवीणसिंह झाला यांना १९९० मधील पोलिस कोठडीतील एका व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विेशेष म्हणजे सुमारे ३० वर्षापूर्वी घडलेल्या प्रकरणात आता शिक्षा मिळाली आहे. 

ज्यावेळी भट्ट गुजरातमधील जामनगर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक होते; त्यावेळी जातीय दंगली प्रकरणी १५० लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेदरम्यान जामजोधपूर शहरात झालेल्या जातीय दंगली प्रकरणी ही कारवाई केली होती. यावेळी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलेल्या प्रभूदास वैष्णनी या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचा पोलिस कोठडीत छळ केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा भाऊ अमृतलाल वैष्णनी यांनी केलेल्या तक्रारीनंतर आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्यासह आठ पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद झाला होता.  

या प्रकरणी जलद सुनावणी घेण्याचा आदेश गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सोनिया गोकानी यांनी दिला होता. यावर संजीव भट्ट आणि प्रविणसिंह झाला यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी अन्य संशयितांना देखील पोलिस कोठडीत छळवणूक केल्याप्रकरणी कलम ३२३, ५०६ अन्वये दोषी ठरविले आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.
हा निवाडा न्यायाधीश डी एम व्यास यांनी दिला आहे. तर अन्य पाच संशयितांना अद्याप शिक्षा सुनावलेली नाही.