Thu, Oct 01, 2020 18:55होमपेज › National › हैदराबाद चकमकीच्या निमित्ताने....

हैदराबाद चकमकीच्या निमित्ताने....

Last Updated: Dec 07 2019 10:16AM
अभ्युदय रेळेकर
 

हैदराबाद महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर, या बिरुदावलीला बलात्कार आणि हत्या प्रकरणाने बट्टा लागला होता. हा काळा डाग घेऊनच या शहराला पुढे वाटचाल करावी लागणार होती; मात्र ही चकमक या शहराच्या बिरुदावलीच्या पथ्यावर पडली, असेच म्हणावे लागेल. कोणतीही चकमक ही वाईटच; मात्र या चकमकीमुळे पीडितेला न्याय मिळाला, अशी सर्वसामान्य भावना मात्र दिसून येत आहे. कोर्ट-कचेर्‍या आणि त्यातून न्याय मिळण्यास लागणारा वेळ यामुळे घटनेचे गांभीर्य कमी होत असते. म्हणूनच, अशा घटनांची सुनावणी विशेष न्यायालयात विशिष्ट कालावधीतच पूर्ण करण्याची तरतूदही आहे. त्याप्रमाणे सुनावणीही होत असते. तरीही अनेकदा ही प्रक्रिया या न्यायालयातून त्या न्यायालयात फिरत राहते आणि कालापव्यय होतच असतो. मग कुठे तरी न्याय मिळालाच नाही, न्याय मिळण्यामध्ये वेळ लागत आहे, न्याय मिळण्यासाठी कोणकोणती परिस्थिती आणि प्रसंगांना तसेच सुनावणीला सामोरे जावे लागते, याचा अनुभव आता सर्वांनाच माहीत आहे.

हैदराबादमधील चकमकीची माहिती हळूहळू हाती येत आहे. त्यामध्ये आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले होते. त्यावेळी पोलिस तपासाप्रमाणे प्रत्यक्ष घटनेची परिस्थिती निर्माण करून आरोपींनी नेमके काय काय केले, याचे टिपण तयार करायचे असते. त्याला ‘सीन रिक्रिएशन’ असं म्हटलं जातं. या सीन रिक्रिएशनच्या वेळीच त्यातील एका आरोपीने पोलिसाचे हत्यार हिसकावले. त्यातून पोलिसावर गोळीबार केला. त्यानंतर पळून जात असताना त्यांना पोलिसांना मारावे लागले. या घटनेवर आता संशय घेतला जाणार, यात वादच नाही. तसेच या घटनेच्या अनुषंगाने अनेक बाजूंनी प्रश्‍न तसेच तर्क-वितर्क उपस्थित गेले जात आहेत. ही खोटी चकमक होती, पोलिसांनी त्या चौघांना मुद्दामच मारले, पोलिसांनी यावेळी कायदा हातात घेतला. त्या चौघांनीच बलात्कार केला होता, हे तरी सिद्ध झाले होते का, त्यांना पायांवर गोळ्या घालून जखमी करून पकडता आले असते. जीव जाईल अशा वर्मावर पोलिसांच्या गोळ्या त्या आरोपींना कशा लागल्या, असे एक नाही तर शेकडो प्रश्‍न आता उपस्थित केले जातील. त्यात काही वावगेही नाही; मात्र ही चकमक खोटी होती, अशा निष्कर्षावर लगेचच येणेही योग्य नाही.

आता चकमकीत चौघेही आरोपी ठार झालेले आहेत. या चकमकीचीही चौकशी होईल. पोलिसांचा दोष आहे की नाही, याचीही शहानिशा या चौकशीमध्ये होईल. विद्यमान परिस्थितीत उद्विग्‍न लोक पोलिसांच्या पाठीशी उभे राहतील; मात्र या चकमकीच्या चौकशीचा फेरा सुरू होईल, त्यावेळी त्याला फक्‍त संबंधित पोलिसांनाच तोंड द्यावे लागेल. त्यावेळी आता पोलिसांना शाबासकी देणारी मंडळी, त्यांच्यावर पुष्पवृष्टी करणारे लोक पोलिसांबरोबर असणार नाहीत. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी किंवा आपणच न्याय करू या, या भावनेतून केवळ भावनेच्या भरात पोलिसांनी या चौघांचे एन्काउंटर केले असेल, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण, तपास प्रक्रिया किती किचकट आणि त्रासदायक असते, हे पोलिसांना वेगळे कुणी सांगण्याची गरज नाही. तसेच चकमकीच्या प्रकरणामध्ये नामोहरम होण्याची वेळ आलेले पोलिस अधिकारीही काही कमी नाहीत. त्यांचे दुःख आणि त्यांच्या वेदना किती आणि काय असतात, ते तुरुंगवारी करून आलेल्या चकमक फेम पोलिसांनी कथन केलेलेच आहे. त्यामुळेच हातात हत्यार असूनही ते चालवण्यासाठी पोलिस एक-दोन नव्हे, तर शंभर वेळा विचार करतात. अशा परिस्थितीत पोलिसांनी ही आगळीक केली असावी, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. जरी ती तशी केली असेल, तरी त्याच्या सर्वच साधकबाधक परिणामांचा विचार करूनच जे काही झालं ते झालं असेल, असेच म्हणावे लागेल.

गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, यात शंकाच नाही; मात्र गुन्हेगाराला कायद्याच्या मार्गाने शिक्षा झाली पाहिजे. तशीच शिक्षा कसाबला झाली. त्यासाठी तपास यंत्रणा आणि कोर्टालाही व्यापक जनभावनेच्या रोषाला वेळोवेळी सामोरे जावे लागले; मात्र एक वस्तुपाठ कसाब खटल्यातून जगाला घालून दिला गेला. अशाच प्रकारे बलात्कार किंवा कोणत्याही गुन्ह्यामध्ये अत्यंत जलद गतीने न्यायव्यवस्था कार्यरत करून कायद्याच्या चौकटीत योग्य न्याय मिळाला पाहिजे. 

चकमकीचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. या चकमकीचा कुणीही निषेध केलेला नाही. जरी त्याबद्दल संशय व्यक्‍त केला गेला असला तरी त्यातून योग्य न्याय मिळण्यात वेळ लागतो, यावरच बोट ठेवल्याचे दिसून येते. एकूणच या चकमकीचा आणि त्यानंतर आलेल्या साधकबाधक प्रतिक्रियांचा विचार करता आपल्याकडे तपास आणि न्यायप्रक्रिया संथपणे होते हाच एक सार्वत्रिक विचार समोर आला. तसेच अशा प्रकरणांमध्ये लवकरात लवकर न्यायनिवाडा करून तत्काळ शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे. या दोन गोष्टी अधोरेखित होतात. याच दोन गोष्टींचा विचार या यंत्रणा राबवणार्‍या प्रत्येकाने केला पाहिजे, हीच अपेक्षा आहे.                              

 "