Wed, Oct 28, 2020 11:20होमपेज › National › बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, कोरोना रुग्णांनाही करता येणार मतदान

बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, कोरोना रुग्णांनाही करता येणार मतदान

Last Updated: Sep 25 2020 1:20PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला १६ जिल्ह्यांत ७१ जागांसाठी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यांत ३ नोव्हेंबर रोजी १७ जिल्ह्यांत ९४ जागांसाठी तर तिसऱ्या टप्प्यांत ७ नोव्हेंबर रोजी १५ जिल्ह्यांत ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. १० नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर बिहारमध्ये वाल्मिकी नगर लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. 

विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपत आहे. बिहार विधानसभेत २४३ जागा आहेत. २४३ मधून ३८ जागा अनुसूचित जातीसाठी आणि २ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत.

निवडणूक आयोगाने कोरोना काळात बिहारमध्ये प्रचार करण्यासाठी पूर्वीच गाईडलाईन जारी केल्या आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत या गाईडलाईन्सचे पालन करावे लागणार आहे. 

सुनील अरोरा म्हणाले, निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे ऑनलाईन अर्ज भरायला सांगितले आहेत. तर दुसरीकडे अनेक नियमांचे सक्तीने पालन करणे गरजेचे आहे. अर्ज करताना दोनहून अधिक गाड्यांचा वापर करता येणार नाही. निवडणुकीचा प्रचार करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक आहे. ५ हून अधिक लोक घरी जाऊन प्रचार करू शकणार नाहीत. कोरोना रुग्ण शेवटच्या तासांत मतदान करतील. सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. एका बूथवर केवळ १ हजार मतदार मतदान करतील. 

मतदानावेळी ७ लाख हॅण्ड सॅनियटायजर, ४६ लाख मास्क, ६ लाख पीपीई किट्स, ६.७ लाख फेस शिल्ड, २३ लाख हॅण्ड ग्लोव्ह्जची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली आहे. 

बिहारमध्ये विरोधी पक्ष कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत होते. परंतु, आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे. 

 "