नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन
पत्रकारांसाठी लँडलाईन आणि इतर गरजेच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत अशी माहिती आज सरकार पक्षाकडून ॲटर्नी जनरल केके वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात दिली. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याप्रकरणी याचिकांच्यावरील सुनावणीवेळी त्यांनी ही माहिती दिली.
जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर घालण्यात आलेल्या निर्बंधाविरोधात ८ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकावर आज, सोमवारी (दि.१६)सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. या याचिकांमध्ये एक याचिका काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचीसुद्धा आहे. पण यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
काश्मीर संदर्भातील या सर्व याचिकांची सुनावणी सरन्यायाधिश रंजन गोगोई आणि न्यायाधीश एस.ए. बोबडे आणि अब्दुल नजीर यांच्या पीठापुढे सुरू आहे.
काश्मीरचे नेते सज्जाद लोन, खासदार आणि एमडीएमकेचे नेते वायको, बाल हक्क कार्यकर्ते इनाश्री गांगुली, प्राध्यापक शांता सिन्हा आणि काश्मीर वृत्तपत्राच्या संपादिका अनुराधा बसिन यांनीही ३७० कलमाविरोधात याचिका दाखल केल्या आहेत.
काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. याचिकेत आझाद यांनी त्यांच्या घरच्या राज्यात जाण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. ज्या राज्यात नातेवाईक आणि कुटुंबीय राहते तिथं जाता यावं, त्यांना भेटता यावे असे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे एमडीएमके नेते वायको यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दूल्ला यांच्या सुटकेसाठी सुप्रीम कोर्टात याचिा दाखल केली आहे. ते सध्या नजरकैदेत आहेत. त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याचे वायको यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. तसेच करुणानिधी यांच्या १११व्या जयंती निमित्त त्यांचा निमंत्रित केले आहे. त्यासाठी त्यांची सुटका करण्याची मागणी वायको यांनी केली आहे. यावर कोर्टाने केंद्राला नोटीसही पाठवली आहे.