Sat, Aug 15, 2020 13:28होमपेज › National › ओम बिर्ला यांची लोकसभेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड

ओम बिर्ला लोकसभेचे नवे सभापती

Published On: Jun 19 2019 11:26AM | Last Updated: Jun 19 2019 11:44AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

लोकसभेच्या नवीन सभापतीपदाचा सस्पेंस अखेर आज संपला. भाजपचे राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांची लोकसभेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्‍यांनी आज एनडीएचे उमेदवार म्हणून सभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्‍यानंतर काँग्रेस, तृणमूल, डीएमके आणि बीजेडी यांच्यासह सर्व पक्षांनी त्‍याच्या निवडीला पाठिंबा दिला.   

लोकसभा सभापती पदावरून अनेक अटकळी बांधल्या जात होत्या. मात्र, ओम बिर्ला यांची सभापतीपदी निवड झाल्‍यानंतर सभापतीपदाचा सस्‍पेंस संपला आहे. 

लोकसभेत एनडीएकडे बहुमत आहे. यामुळे त्यांचा उमेदवार सभापती होणे निश्चित मानले जात होते. लोकसभा सभापतीपदासाठी माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, ओम बिर्ला यांना सभापतीपद देण्यावर एनडीएमध्ये एकमत झाले. 

कोण आहेत ओम बिर्ला?
खासदार होण्यापूर्वी बिर्ला हे कोटा दक्षिण येथून तीनवेळा आमदार राहिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार राम नारायण मीणा यांचा २ लाख ७९ हजार मतांनी पराभव केला होता. बिर्ला यांची त्यांच्या मतदारसंघात पर्यावरण संरक्षक म्हणून ओळख आहे. त्यांनी ग्रीन कोटा मोहिमेतर्गंत झाडे लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले. पर्यावरण जागृतीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.

विशेष म्हणजे लोकसभा सभापतीपदासाठी मोदी सरकारने पुन्हा एकदा पारंपरिक पद्धत अवलंबिलेली नाही. गेल्या लोकसभेत इंदोर येथील खासदार सुमित्रा महाजन या सभापती होत्या.