Mon, Apr 12, 2021 03:07
मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत १५ लाख कोटी रुपये मंजूर

Last Updated: Apr 07 2021 3:25PM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत 14.96 लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. बँका, गैरबँकींग वित्‍तसंस्था तसेच लघुवित्‍त संस्थांद्वारे 28.68 कोटी लाभधारकांना हे कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. वित्‍तीय सर्वसमावेशकता तसेच छोट्या, मध्यम आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली होती. 8 एप्रिल 2015 रोजी सुरु झालेल्या या योजनेनुसार लाभार्थ्याला 10 लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. 

1.48 लाख कर विवाद प्रकरणांचा निपटारा..

दरम्यान, विवाद से विश्‍वास योजनेद्वारे आतापर्यंत 1.48 लाख कर विवाद प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाकडून (सीबीडीटी) देण्यात आली आहे. वादात असलेल्या एक लाख कोटी रुपयांपैकी 54 टक्के रक्‍कमेची वसुली झाली असल्याचेही सीबीडीटीचे चेअरमन प्रमोद मोदी यांनी सांगितले.