Thu, Nov 26, 2020 21:29होमपेज › National › अमित शहा निघाले दक्षिण दिग्विजयाला...

अमित शहा निघाले दक्षिण दिग्विजयाला...

Last Updated: Nov 21 2020 10:10PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचेन्‍नई : वृत्तसंस्था

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या चेन्‍नई दौर्‍यावर शनिवारी येथे दाखल झाले. हा दौरा म्हणजे बिहार विजयानंतर शहा यांच्या दक्षिण दिग्विजयाची नांदी मानला जातो आहे. शनिवारी येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर विविध राज्यांमध्ये विकासाची स्पर्धा वाढली आहे. ही देशासाठी एक उत्तम बाब आहे. गतिमान सुशासनात तामिळनाडू यंदा देशात अव्वल ठरला, ही आनंदाची गोष्ट आहे, असे शहा यांनी सांगितले. 

यादरम्यान पुढच्या वर्षी होणार्‍या निवडणुकांमध्येही एआयएडीएमके आणि भाजपची युती कायम राहील, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, सर्व संकेत झुगारून शहा विमानतळावरून एका मोठ्या अंतरापर्यंत पायी चालत गेले. रस्त्यावर दुतर्फा भाजप आणि एआयडीएमकेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांना अभिवादन केल्यानंतरच शहा येथून रवाना झाले. चेन्‍नई विमानतळावर मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष एल. मुरुगन यांनी शहा यांचे स्वागत केले. तामिळनाडूत पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचे आडाखे आणि आराखडे ठरविण्यासाठी शहा यांचा हा दौरा असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविला जात आहे.

रजनीकांत यांची भेट घेणार

अमित शहा हे सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विविध राजकीय पक्ष विरोध करत असताना रजनीकांत यांनी केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला आपला पाठिंबा दर्शविला होता. या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरेल. तथापि, रजनीकांत यांनी प्रकृतीचे कारण देऊन तूर्त सक्रिय राजकारणात प्रवेशापासून दूर राहणार असल्याचे याआधीच सांगितलेले आहे. अर्थात, योग्य वेळ येताच राजकारणातील प्रवेश शक्य असल्याचे सूतोवाचही रजनीकांत यांनी जोडीला केलेलेच आहे.