Wed, May 19, 2021 06:03होमपेज › National › काँग्रेसमध्ये नेतृत्वाची समस्या नाही

काँग्रेसमध्ये नेतृत्वाची समस्या नाही

Last Updated: Nov 22 2020 10:23PM

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिदनवी दिल्ली : पीटीआय

बिहार विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर काँग्रेस नेतृत्वावर टीका होत असताना आता पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी पक्षात नेतृत्वाची समस्या नसल्याचे सांगितले आहे. तसेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सर्वांचा पाठिंबा असून, ज्यांना हे दिसत नाहीत ते आंधळे आहेत, असे म्हटले आहे. 

खुर्शिद यांनी पीटीआयला मुलाखत दिली. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, पक्षाबाहेर मते व्यक्त केल्याने नुकसान होते. पक्षनेतृत्व सर्वांचे ऐकते. पक्षनेतृत्व ऐकत नाही, असे पसरवणे चुकीचे आहे. काही गोष्टी जगाला ओरडून सांगायची गरज नाही. सोनिया आणि राहुल यांना पूर्ण पाठिंबा आहे.  नेतृत्वावर प्रश्‍न उपस्थित करणारे लोकशाहीवादी असतील तर त्यांनी नेतृत्वावर प्रश्‍न उपस्थित न करणार्‍या आमच्यासारख्यांनाही लोकशाहीवादीच मानावे. अडचण इतकीच आहे की, हे सर्व पक्षात न होता पक्षाबाहेर बोलले जात आहे. 

कोरोनामुळे अध्यक्ष निवडीला विलंब

खुर्शिद म्हणाले, काँग्रेस कार्यकारिणीत प्रत्येक गोष्टीचे विश्‍लेषण होते. आताही ते होईल; पण काय व्हावे, हे सार्वजनिकरीत्या कुणीही सांगायची गरज नाही. नव्या अध्यक्ष निवडीत वेळ लागत असेल तर त्या पाठीमागे योग्य कारण असेल. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत. पक्षात नेतृत्वाची समस्या नाही. निवड समिती अध्यक्ष निवडीवर काम करत आहे. कोरोनामुळे याला विलंब होत आहे.

फाईव्हस्टार संस्कृती, चाटुगिरीमुळे काँग्रेसचे पतन : गुलाम नबी आझाद 

पक्षातील फाईव्हस्टार संस्कृती आणि चाटुगिरीमुळे काँग्रेसचे आणि पक्षातील नेत्यांचे पतन झाले आहे, असे मत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेतील गटनेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले. आझाद म्हणाले की, आम्ही सर्वच पक्षाच्या  नुकसानीबाबत  चिंतेत आहोत. बिहार आणि पोटनिवडणुकीतील निकालांमुळे जास्त चिंता आहे; पण यासाठी नेतृत्वाला दोष देता येणार नाही. पक्षातील नेत्यांनी फाईव्हस्टार संस्कृतीचा त्याग केल्याशिवाय कुठलीही निवडणूक जिंकता येणार नाही. नेत्यांचा तळागाळाशी संपर्क तुटला आहे. आज एखाद्या नेत्याला उमेदवारी मिळाल्यास तो फाईव्हस्टार हॉटेल बुक करतो. ओबडधोबड रस्ता असलेल्या ठिकाणी प्रचारासाठी जात नाहीत. जोपर्यंत पक्षातील नेते फाईव्हस्टार संस्कृतीचा त्याग करत नाहीत, तोपर्यंत कुठलीही निवडणूक जिंकणे अवघड आहे. फाईव्हस्टार संस्कृती आणि चाटुगिरी हेच काँग्रेसचे आणि पक्षातील नेत्यांच्या पतनाचे मुख्य कारण आहे. 

काँग्रेस प्रभावी विरोधी पक्ष राहिलेला नाही : कपिल सिब्बल

काँग्रेस देशातील प्रभावी विरोधी पक्ष राहिलेला नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पुन्हा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सिब्बल म्हणाले की, काँग्रेस आपली संघटना मजबूत करण्यासाठी कोणताच प्रयत्न करत नाही. पक्षाने एक वर्षापेक्षाही जास्त कालावधी होऊनही अद्याप स्थायी अध्यक्ष निवडलेला नाही. अध्यक्षाविना दीड वर्ष राजकीय पक्ष काम कसे करू शकेल? नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा आणि पोटनिवडणुकांवरून हे स्पष्ट झाले आहे की, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काँग्रेसचा काहीही प्रभाव राहिलेला नाही. याखेरीज गुजरात आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यात जिथे काँग्रेस थेट भाजपचा सामना करीत होती, तेथेही काँग्रेस उमेदवारांचे निकाल फार वाईट लागले आहेत.