नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
दहशतवाद्यांवर कारवाई करत असल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा नेहमीच समोर आला आहे. ‘एफएटीएफ’ ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी दहशतवाद्यांवर लगाम कसत असल्याचा ढोंग करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा जगासमोर आला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईद याला गुपचूप कारागृहातून बाहेर काढण्यात आले आहे. पूर्वीच्या लष्कर-ए-तोयबा आणि आताच्या जमाद-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद हा घरामध्ये बसून मौज करत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या मेहरबानीने तो जेल ऐवजी आपल्या जोहर टाऊन नावाच्या घरातून संघटना चालवत असल्याचे समोर आले आहे.
हाफिज सईद याला जुलै २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये त्याला दहशतवाद्यांना फडिंग केल्या प्रकरणी १० वर्षे ६ महिन्यांची शिक्षा झाली होती. शिवाय त्याला १९ नोव्हेंबरला न्यायालयाने आणखी दोन गुन्ह्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. आता ज्या पद्धतीने हाफिजला जेलमधून बाहेर काढण्यात आले आहे, त्यावरुन हे सिद्ध होते की फक्त ‘एफएटीएफ’च्या ब्लॅकलिस्टमधून बाहेर राहण्यासाठी पाकिस्तानने जुलै २०१९ ला हाफिजला पकडण्याचा दाव खेळला होता. हाफिज सईद घरात बसून लोकांशी भेटीगाठी करत आहे. मागील महिन्यात त्याने लष्करच्या जिहाद विंगचा कमांडर जकी-उर-रहमान लखवीने हाफिज सईदची भेट घेतली आहे.
जमात-उद-दावाच्या दहशतवाद्यांविरोधात पाकिस्ताननं तब्बल ४१ खटले दाखल केले आहेत. यामधील २४ खटल्यांचा निकाल लागला आहे. इतर खटल्यांचा निकाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत चार प्रकरणात हाफिज सईदच्या विरोधात निकाला लागला आहे. जमात-उद-दावा ही २००८ साली मुंबईत झालेल्या २६/११ हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित आहे. या संघटनेस आंतरराष्ट्रीय पातळीवर आतकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.