Sat, Aug 08, 2020 12:23होमपेज › National › कोव्हॅक्सिनची पहिली चाचणी ‘भारत बायोटेक’च्या उपाध्यक्षांवर

कोव्हॅक्सिनची पहिली चाचणी ‘भारत बायोटेक’च्या उपाध्यक्षांवर

Last Updated: Jul 04 2020 12:53AM
नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोनावरील कोव्हॅक्सिन नावाची लस 15 ऑगस्टपर्यंत देशभर उपलब्ध होईल अशी शक्यता ‘आयसीएमआर’चे (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्‍त केली आहे. कोरोना लसीच्या क्लिनिकल ट्रायलशी संबंधित संस्थांच्या प्रमुखांना तसे पत्र त्यांनी 2 जुलै रोजी पाठवले आहे.  दरम्यान या लसीची पहिली चाचणी ‘भारत बायोटेक’चे उपाध्यक्ष डॉ.व्ही.के.श्रीनिवास यांच्यावर घेण्यात आली. लस घेणारा मी देशातील पहिला असल्याची भावना त्यांनी व्यक्‍त केली.

कोरोनावरील व्हॅक्सिनच्या विकासासाठी ‘आयसीएमआर’ने भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडसोबत करार केलेला आहे. आयसीएमआर आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल यांच्याकडून विकसित करण्यात येत असलेले हे पूर्णपणे देशी स्वरूपाचे व्हॅक्सिन असणार आहे, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली.

7 जुलैपासून या लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरू करावे, यासाठी उशीर केला जाऊ  नये, या  ट्रायलचे निष्कर्ष लवकर आल्यास  कोरोनावरील या व्हॅक्सिनचे येत्या 15 ऑगस्ट रोजी लाँचिंग करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहितीही ‘आयसीएमआर’कडून शुक्रवारी देण्यात आली.

आयसीएमआरच्या अखत्यारीतील पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने सार्स-सीओव्ही-झेड विषाणूचे स्ट्रेन बाजूला काढले असून त्यावर व्हॅक्सिन विकसित केली जात आहे. व्हॅक्सिनचे प्रीक्लिनिकल तसेच क्लिनिकल विकासाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आयसीएमआर आणि भारत बायोटेक या कंपनीने ‘कोव्हॅक्सिन’नावाची ही लस तयार केली आहे. या लसीच्या मानवी चाचणीसाठी भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) ने परवानगी दिली आहे.

लोकांना वापरण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी व्हॅक्सिन लाँच करण्याचे आयसीएमआरचे उद्दिष्ट आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन लवकरात लवकर व्हॅक्सिन बाजारात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे भार्गव यांनी नमूद केले. ओडिशामधील एका संस्थेसह देशभरातील 12 संस्थांमध्ये कोरोनावरील व्हॅक्सिनचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. या सर्व संस्थांना भार्गव यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. भार्गव यांचे पत्र सर्व जिल्हा प्रशासनालाही प्राप्त झाले आहे.