Tue, Aug 11, 2020 23:53होमपेज › National › ​दिल्ली ते चंदीगड अंतर अवघ्या दोन तासावर!

​दिल्ली ते चंदीगड अंतर अवघ्या दोन तासावर!

Last Updated: Jul 16 2020 4:25PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशावर कोरोना महारोगराईचे संकट अधिक गडद होत असताना देखील केंद्र सरकारकडून विविध योजना तसेच विकास कार्यांना गती देण्याचे काम केले जात आहे. नुकतेच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हरियाणातील विविध महामार्ग योजनांचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंत्रालयातर्फे हरियाणात २० हजार कोटींच्या योजनांचे कामे करण्यात येणार आहे. महामार्गांचे जाळे राज्यात विणण्यात येणार असल्याने दिल्ली ते चंदीगड पर्यंतचे अंतर दोन तासांनी कमी होईल, असा विश्वास गडकरींकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातून दर आठवड्याच्या शेवटी मोठ्या संख्येत दिल्लीकर चंदीगड तसेच अमृतसर ला फिरण्यासाठी जातात. दिल्ली ते चंदीगड सध्या ४ ते ५ तासांचा वेळ लागतो. आता दिल्ली वितानतळावरून चंदीगड पोहचण्यासाठी ४ ऐवजी केवळ २ तास लागतील, असा दावा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. 

रस्त्यांचे महाजाळे विणण्यासाठी विविध योजना हाती घेण्यात येणार आहे. या सर्व योजना २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. अश्यात २०२३ मध्ये नागरिकांना दिल्ली विमानतळ ते ​चंदीगड पर्यंतचे अंतर दोन तासांनी कमी होणार आहे. योजना पूर्णत्वास येताच हरियाणातील नागरिकांना राज्या अंतर्गत तसेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश सोबतची कनेक्टिव्हिटी चांगली होईल, असे मत गडकरींकडून व्यक्त करण्यात आले आहे.

योजना पूर्णत्वास आल्यानंतर इंधनाची बचत होईल तसेच खर्चही कमी होईल. याचा फायदा राज्यातील मागास भागांना होईल. प्रस्तावित मुंबई-दिल्ली एक्सप्रेस-वे, ट्रान्स हरियाणा आर्थिक कॉरिडोअर तसेच गुरुग्राम-रेवाडी-अटेली-नारनौली या नवीन महामार्गांमुळे हरियाणातील सर्व भागात विकासाला चालना मिळेल,असा दावा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. 

इस्लामपूर ते नारनौल दरम्यान २२७ किलोमीटरचा ६ पदरी मार्ग  

गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या प्रमुख योजनांमध्ये इस्लामपूर ते नारनौल पर्यंतच्या २२७ किलोमीटर सहा पदरी महामार्गाचा समावेश आहे. आठ टप्यात हा मार्ग पूर्ण केला जाईल. महामार्गावर ८ हजार ६५० कोटी रूपयांचा खर्च येईल. ४६ किलोमीटर लांब चार पदरी गुरुग्राम पटौदी-रेवाडी मार्ग  एनएच ३५२ डब्ल्यू वर १ हजार ५२४ कोटींच्या खर्चातून उभारण्यात येईल, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.