Tue, Aug 04, 2020 10:29होमपेज › National › राम मंदिर भूमिपूजन तयारी अंतिम टप्प्यात

राम मंदिर भूमिपूजन तयारी अंतिम टप्प्यात

Last Updated: Aug 01 2020 11:35PM
अयोध्या : राहुल पारचा

रामनगरी अयोध्येत पाच ऑगस्टला होणार्‍या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. कार्यक्रमापूर्वी अयोध्येचा कायापालट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अयोध्येत पोहोचल्यावर पंतप्रधान सर्वप्रथम हनुमानगढीचे दर्शन घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पंतप्रधानांनी रामलल्लांचे दर्शन घेतल्यानंतर भूमिपूजन कार्यक्रमाला सुरुवात होईल. कार्यक्रमासाठी उभारण्यात येणार्‍या व्यासपीठालाही अंतिम स्वरूप दिले आहे. व्यासपीठावर केवळ 5 विशेष आमंत्रित उपस्थित राहतील. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तसेच मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांचा समावेश आहे. अयोध्या मानस मंदिरात झालेल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.  पंतप्रधानांची सुरक्षा तसेच कार्यक्रमस्थळावरील व्यवस्थेचा उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, गृहसचिव तसेच पोलिस महासंचालक आढावा घेणार आहेत. सोहळ्यादरम्यान वेगवेगळ्या तीन ब्लॉकमध्ये राज्याचे मंत्री, संघाचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेसह इतर गणमान्य पाहुण्यांची आसन व्यवस्था केली आहे.

भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार्‍या 200 पाहुण्यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. पाहुण्यांची यादी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठविली आहे. कोरोना महारोगराईच्या संकटाकाळात मोजक्याच पाहुण्यांना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यात पंतप्रधानांसह इतर महत्त्वाचे गणमान्य व्यक्ती सहभागी होणार आहेत. सुरक्षेच्या अनुषंगाने त्यामुळे अयोध्येतील प्रत्येक हालचालींवर ड्रोनच्या मदतीने पाळत ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळासह शहरातील इतर भागांतील प्रत्येक हालचालींवर सुरक्षा यंत्रणेचे बारीक लक्ष राहणार आहे. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव आर. के. तिवारी, अवर मुख्य सचिव (गृह) अवनीश कुमार अवस्थी, पोलिस महासंचालक हितेश चंद्र अवस्थी यांच्याकडून सुरक्षेच्या द़ृष्टीने योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ड्रोनच्या सहाय्याने पाळत ठेवण्यासह घरांचे छत तसेच उंच इमारतींवर बंदूकधारी पोलिस कर्मचार्‍यांना तैनात करण्यात येईल. साध्या गणवेशात गुप्तचर विभागाचे तसेच पोलिस कर्मचार्‍यांना तैनात केले आहेे.

अयोध्या दौर्‍यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुर्मीळ लाकडापासून साकारण्यात आलेली दीड फुटांची ‘कोदंड राम’ तसेच एक फुटाची ‘लव-कुश’ यांची प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. भगवान श्रीरामांच्या धनुष्याला कोदंड स्वरूपात ओळखले जाते. सीतेचा शोध घेण्यासाठी प्रभू श्रीराम दक्षिण भारतात पोहोचले, तेव्हा त्यांच्या हातात त्यावेळी कोदंड धनुष्य होते. 

अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी 5 ऑगस्टला होणार्‍या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान रामनगरीत गर्दी होऊ नये, याची विशेष काळजी ट्रस्टकडून घेतली जात आहे. कार्यक्रमादरम्यान कोरोना संबंधित केंद्र सरकारकडून घालून दिलेल्या नियमांचे कडेकोट पालन करण्यात येईल. रामभक्तांनी अयोध्येत येण्याऐवजी घरीच राहून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेसह राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. 

दगडी शिलांना वैदिक नावे 

अयोध्येत राम जन्मभूमिपूजन कार्यक्रमाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. सरकारकडून अयोध्येला आकर्षकरीत्या सजवण्याचे काम केले जात आहे. भूमिपूजन कार्यक्रमापूर्वीच 3 ऑगस्टपासून विशेष पूजेला सुरुवात करण्यात येईल. 5 ऑगस्टपर्यंत चालणार्‍या पूजा अधिष्ठानासाठी खास काशीवरून विद्वान ज्योतिषाचार्यांना बोलावण्यात आले आहे. शुभ मुहूर्तावरच कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे पुन्हा एकदा ट्रस्टकडून स्पष्ट केले आहे. शिलान्यासासाठी विशेष दगडी शिलांचा उपयोग करण्यात येणार आहे. मंदिराच्या गर्भगृहात चांदीच्या 5 शिलांची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या शिलांचे वजन 40 किलो असेल. शिलांचे विशेष असे वैदिक नावे दिली आहेत. नंदा, भद्रा, जया, रिक्ता तसेच पूर्णा नावांच्या या शिला पूर्णत: वैदिक विधीने प्रतिष्ठापित करण्यात येणार आहेत. राम मंदिर निर्माणासाठी दगडावर सुबक कारागिरी केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सुरू होते. यासाठी राजस्थानवरून विशेष खडक आणण्यात आले आहेत. दगडाची कटाई केल्यानंतर त्याला आकार दिला जात आहे. 

श्रीराम मंदिरासह अयोध्येचा विकास

श्रीराम मंदिराच्या शिलान्यासानंतर मंदिर निर्माणाचे कार्य लवकरात लवकर सुरू होईल. जसजसे मंदिराला मूर्त स्वरूप प्राप्त होईल तसतसे अयोध्येचा विकास द़ृष्टिपथात दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी देश-विदेशातून भाविक अयोध्येत येतील. भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. अयोध्येत जास्तीत जास्त भक्तांच्या निवासाची व्यवस्था ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. 

‘अयोध्या ते फैजाबाद’पर्यंत ध्वनिक्षेपकांची व्यवस्था 

राम मंदिर भूमिपूजन परिसरात पंतप्रधानांच्या आगमनासह संपूर्ण वातावरण राममय करण्यासाठी ध्वनिक्षेपकांची व्यवस्था केली आहे. ध्वनिक्षेपक लावण्याचे काम वेगाने केले जात आहे. सर्व रामभक्तांच्या कानापर्यंत पूजा-पाठातील मंत्रोच्चार पोहोचावा या उद्देशाने अयोध्या ते फैजाबादपर्यंत ध्वनिक्षेपके लावण्यात येतील. कार्यक्रमाच्या तयारीवर सरकारही नजर ठेवून आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली तयारी केली जात आहे.

कार्यक्रमासाठी 1 लाख 25 हजार दिवे अन् रांगोळ्यांची आरास 

पंतप्रधानांच्या हस्ते होणार्‍या मंदिर भूमिपूजन सोहळ्याला भव्य-दिव्य बनवण्यासाठी राम जन्मभूमी परिसर, राम की पैडीसह शहरातील 25 ठिकाणी रांगोळीची आरास बघायला मिळेल. यासह राम की पैडीत 1 लाख 25 हजार दिवे प्रज्वलित करण्यात येतील. विद्यापीठला यासंबंधीची तयारी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यासाठी कला शाखेतील 200 हून अधिक स्वयंसेवकांना नियुक्त करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता स्वयंसेवक मास्क घालून तसेच भौतिक दूरत्वाच्या अटीचे पालन करीत काम करतील.

34 वर्षानंतर अयोध्येत पुन्हा ‘दिवाळी’

श्रीराम जन्मभूमीचे पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, रामजन्मभूमीचे टाळे ज्यावेळी  उघडले होते, त्यावेळी संपूर्ण अयोध्येत उत्साह संचारला होता. 1949 नंतर जवळपास 37 वर्षांनंतर रामलल्ला एक प्रकारे कैदेतून मुक्त झाले होते. याचा आनंदात जवळपास एक आठवड्यापर्यंत अयोध्येतील रामभक्तांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता. देशातच नाही तर विदेशातून आलेल्या रामभक्तांनी हा आनंदोत्सव साजरा केला होता. आता जवळपास 34 वर्षांनंतर पुन्हा एकदा अयोध्येत उत्सवाचा दिवस आला आहे. 1986 सालाहून मोठा उत्सवाचा हा दिवसा आहे. आता रामलल्लांचे भव्य-दिव्य मंदिर बनवण्यात येणार असल्याचा हा आनंदोत्सव असल्याची भावना दास यांनी व्यक्त केली. 

अयोध्येत पोहोचली प्रमुख तीर्थस्थळांची माती 

देशातील सर्व प्रमुख तीर्थस्थळ, राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारके, तसेच पवित्र नद्यांचे माती तसेच जल, श्रीराम जन्मभूमी मंदिर बांधणीसाठी अयोध्येत पोहोचल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने श्री बद्रिनाथ धाम, किल्ले रायगड, रंगनाथस्वामी मंदिर (तामिळनाडू), महाकालेश्वर मंदिर, हुतात्मा चंद्रशेखर आझाद, तसेच बलिदानी बिरसा मुंडा यांच्या जन्मभूमीसह सर्व तीर्थ तसेच बलिदानी शूर वीरांच्या प्रेरणास्थळावरून माती, पाणी तसेच इतर वस्तू अयोध्येत पोहोचल्या आहेत.

पंतप्रधानांकडून मिळणार सांस्कृतिक प्रकल्पांसाठी सव्वा लाख कोटी

अयोध्या : वृत्तसंस्था

अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. याप्रसंगी ते अयोध्येत 84 कोसपर्यंतच्या सांस्कृतिक सीमा विकसित करण्यासाठी प्रस्तावित विविध प्रकल्पांसाठी सव्वा लाख कोटी रुपये निधीची घोषणा करण्याची शक्यता आहे.  भारत सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत रामकथा गॅलरी, महारानी स्मारक, बस डेपोचे बांधकाम, दिगंबर रिंगणात बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम, जुन्या बसस्थानकात पार्किंग, अयोध्येत राम यांच्या पैडीचे सौंदर्यीकरण, हनुमान गढी, कनक भवन, परिक्रमा मार्ग, यात्री निवास, पाटेश्वरी देवी मंदिर, चौक अयोध्या ते हनुमानगढीकडे जाणार्‍या पादचारी मार्गाचे नूतनीकरण, रेल्वे स्थानकातील टीआयसी बूथचे काम व गुप्तार घाटाचे सुशोभीकरण असे 133 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अयोध्या-अलाहाबाद रोड ते अयोध्या ते सुलतानपूर रोडपर्यंतचे 266 कोटी रुपये अपग्रेडेशन व मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

राम वन गमन मार्गासाठी 176 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. राम जानकी मार्ग बांधण्यासाठी 2 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येईल. फैजाबाद-जगदीशपूर चौपदरी महामार्गासाठी 1056.41 कोटी मंजूर आहेत. 84 कोस परिक्रमा मार्गावर राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे दोन्ही बाजूंना वृक्षारोपण आणि प्रवासी निवासासाठी सुमारे 4 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.