Tue, Sep 29, 2020 09:04होमपेज › National › हा तर हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस : ओवेसी

हा तर हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस : ओवेसी

Last Updated: Aug 05 2020 6:48PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

प्रभू श्री राम मंदिराच्या भूमीपूजनाचा उत्सह सा-या देशभरात साजरा केला गेला. जय श्री राम या नामघोषाने अवघा देश दुमदुमला. मात्र, एआयएमआयएमचे प्रमुख व पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. राममंदिरचा शिलान्यास करून पंतप्रधान पदाच्या शपथेचे नरेंद्र मोदी यांनी उल्लंघन केले आहे. त्यामुळे आज लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे, असे म्हणत एआयएमआयएमचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पीएम मोदींवर टीका केली आहे. 

अयोध्येत आज (दि. ५) श्री राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संपन्न झाला. त्यानंतर  एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रीया दिली.

ओवेसी म्हणाले, आजचा दिवस हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस असून धर्मनिरपेक्षतेचा पराभव झाला आहे. पंतप्रधान मोदींनी आज अयोध्येत राम मंदिराचा शिलन्यास करून हिंदू राष्ट्राचा एक प्रकारे पाया घातला आहे. 

श्री राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यादरम्यान पंतप्रधानांनी आज आपण भावनिक झाल्याचे सांगितले. ते जसे भावनीक झाले त्याप्रमाणे मी सुद्धा भावनिक झालो आहे. कारण मी नागरिकतेच्या समानतेवर विश्वास ठेवतो. मिस्टर पंतप्रधान, मी भावनिक आहे कारण तेथे ४५० वर्षांपासून मस्जिद उभी होती. 

काँग्रेसवर निशाणा साधत ओवेसी म्हणाले, १९९२ ला बाबरी मशीद पाडण्यासाठी कॉंग्रेसही तितकीच जबाबदार असल्याचे म्हटले. 

राम मंदिराचे भूमीपूजन करण्यापूर्वी ट्विट...

राम मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमापूर्वी असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विटरवर दोन छायाचित्रे पोस्ट केली. तसेच 'बाबरी मशीद होती, आहे आणि राहील. इंशा-अल्लाह. हॅशटॅग बाबरी जिवंत आहे, असे म्हटले होते. त्यानंतर हा हॅशटॅग ट्विटरच्या ट्रेंडमध्ये आला होता.

 "