Sat, Aug 15, 2020 16:26होमपेज › National › लोकशाहीला तडा गेलाय, राहुल गांधींचे केंद्रावर टीकास्त्र

लोकशाहीला तडा गेलाय, राहुल गांधींचे केंद्रावर टीकास्त्र

Last Updated: Aug 02 2020 4:33PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्या सुटकेची मागणी केली असून ट्विटरवरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

शुक्रवारी ईदच्या आदल्या दिवशी आणि कारवाई करुन जवळपास वर्ष झाल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना ताब्यात ठेवण्याचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. या मुद्यावर संतप्त होत राहुल गांधी यांनी लोकशाहीला तडा गेला असल्याची टीका जोरदार टीका केली आहे. 

केंद्र सरकारने गतवर्षी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लडाख व जम्मू-काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले. परिणामी जम्मू-काश्मीरमध्ये कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल यादृष्टीने अनेक राजकीय नेत्यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांना नजरकैदेत ठेवले गेले. यामध्ये मेहबुबा मुफ्ती यांचाही समावेश होता. हळूहळू अनेक नेत्यांची सुटका करण्यात आली आहे. मार्च महिन्यात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांची केंद्र सरकारकडून लॉकडाऊन जाहीर होण्याच्या काही दिवस आधीच सुटका करण्यात आली.

राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलंय की, केंद्राने मेहबुबा मुफ्ती यांची सुटका केली पाहिजे. जेव्हा केंद्र सरकार बेकायदेशीपणे राजकीय नेत्यांना ताब्यात घेते तेव्हा भारताच्या लोकशाहीला तडा जातो, असा आरोप करत केंद्रावर निशाणा साधला आहे.