Thu, Nov 26, 2020 21:15होमपेज › National › जलस्रोत संरक्षित करा

जलस्रोत संरक्षित करा

Last Updated: Nov 22 2020 11:46PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

जलस्रोतांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल एजन्सी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. जलस्रोतांसाठी मुबलक उपाययोजना करण्यात न आल्याने ‘एनजीटी’ने हे आदेश दिले आहेत.

राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांच्या देखरेखीत एजन्सी स्थापन करण्यात यावी तसेच 31 जानेवारी 2021 पर्यंत बैठका घेत भविष्यातील नियोजन तसेच उचलण्यात येणार्‍या पावलांसंबंधी योजना बनवण्याचे निर्देश ‘एनजीटी’ने दिले आहेत.

‘एनजीटी’ने सर्व जिल्हाधिकार्‍यांना तसे निर्देश दिले आहेत. स्वत:च्या देखरेखीखाली कारवाई सुरू करावी, असे म्हटले आहे. सर्व राज्यांनी एका वर्षात किमान तीनवेळा जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांवर देखरेख ठेवावी. तसेच देशातील 351 हून अधिक नद्या प्रदूषणमुक्‍त करण्याच्या उद्देशाने योजना आखण्यासाठी केंद्रीय देखरेख समिती स्थापन केली आहे. जलस्रोत संरक्षित करण्याच्या उपायांचा पहिला आढावा 31 मार्च 2021 पर्यंत घ्यावा, अशी सूचनाही ‘एनजीटी’ने केली आहे.

हरियाणातील लेफ्टनंट कर्नल (सेवानिवृत्त) सवदमनसिंह ओबेरॉय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर प्राधिकरणासमोर सुनावणी सुरू आहे. त्यावेळी प्राधिकारणाने हे निर्देश दिले आहेत.