Thu, Nov 26, 2020 21:19होमपेज › National › लसींची उपयुक्तता ९० टक्क्यांवर सिद्ध

लसींची उपयुक्तता ९० टक्क्यांवर सिद्ध

Last Updated: Nov 22 2020 10:42PM
वॉशिंग्टन/बीजिंग

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना कोरोनाला निर्बंध घालण्याच्या द़ृष्टीने शास्त्रज्ञांना मिळालेले यश आश्वस्त करणारे आहे. चाचणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या काही लसींचे परिणाम चांगले आलेले आहेत. विविध कोरोना प्रतिबंधक लसींची उपयुक्तता सरासरी 90 टक्क्यांवर सिद्ध झाल्याचे समोर आले आहे.

फायझर कंपनीची लस अमेरिकेत आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात आणता येईल, असे संकेत मिळाले आहेत. अमेरिकेतीलच ‘मॉडर्ना’च्या लसीची परिणामकारकता 94.5 टक्क्यांनी सिद्ध झालेली आहे. अमेरिकेतीलच फायझर कंपनी पुढील महिन्यापासून लसीचे मर्यादित व्यावसायिक उत्पादन सुरू करणार आहे. दरम्यान, सर्व लसींमध्ये ‘सुपर व्हॅक्सिन’ आमचीच असल्याचा दावा चीनने केला आहे. 

अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीच्या कोरोनावरील लसीच्या एका डोसची किंमत 25 ते 37 डॉलर (जवळपास 1,800 ते 2,700 रुपये) असेल. ही माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिफन बेन्सेल यांनी दिली. ‘मॉडर्ना’शी लाखो डोस खरेदीचा करार आम्ही केलेला असल्याची माहिती गेल्या 16 नोव्हेंबरला युरोपियन आयोगातील एका अधिकार्‍याने दिली होती. तेव्हा एका डोसची किंमत 25 डॉलरपेक्षा (1,800 रुपयांपेक्षा) कमी असेल, असेही हा अधिकारी म्हणाला होता. त्यावर ‘मॉडर्ना’चे बेन्सेल म्हणाले की, अद्याप असा कुठलाही करार झालेला नाही. चर्चा मात्र सुरू आहे. ‘मॉडर्ना’ची लस जगभरातील विविध वंशाच्या 30 हजार स्वयंसेवकांवर यशस्वीपणे आजमावली गेली आहे. 

‘फायझर’कडून परवानगी

‘फायझर’ने अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाकडे लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मागितली आहे. ‘फायझर’ आणि सहकारी जर्मन कंपनी ‘बायोएनटेक’ने युरोपियन महासंघ आणि ब्रिटनमध्येही आपत्कालीन वापरासाठी परवानगीचा अर्ज केला आहे. आपली लस 95 टक्के सुरक्षित असल्याचा दावा ‘फायझर’ने केला आहे.

नाताळपर्यंत ‘ऑक्सफर्ड’ची लस?

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लस चाचणीचे प्रमुख अँड्र्यू पोलार्ड यांनी सांगितले की, नाताळपर्यंत लसीला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. ही लस ‘फायझर’पेक्षा 10 पटीने स्वस्त असेल. ‘फायझर’ची लस सुरक्षित ठेवायची, तर उणे 70 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान आवश्यक आहे, ही यातील एक कठीण बाजू सोडली तर उपयुक्ततेत ही लसही उत्तम असल्याचे समोर आलेले आहे. 

चीन म्हणतो, ‘सुपर व्हॅक्सिन’ आमचीच 

चीनमध्ये विकसित करण्यात आलेली लस हीच कोरोनावरील ‘सुपर व्हॅक्सिन’ आहे, असा दावा चीनमधून केला जात आहे. ‘सिनोफार्म’ या चिनी कंपनीची ही लस 10 लाख लोकांना देण्यात आली आहे. मात्र, एकालाही साईड इफेक्ट जाणवले नाहीत. महत्त्वाचे म्हणजेे, यातील एकालाही नंतर कोरोनाची बाधा झाली नाही, असा दावा ‘सिनोफार्म’कडून करण्यात आला आहे. ‘सिनोफार्म’ लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीत 60 हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. संयुक्त अरब अमिरात, बहारीन, इजिप्त, जॉर्डन, पेरू आणि अर्जेंटिनासह दहा देशांमध्ये ती सुरू आहे.