Tue, Sep 29, 2020 18:43होमपेज › National › कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीसाठी ‘सीरम’ला परवानगी

कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीसाठी ‘सीरम’ला परवानगी

Last Updated: Aug 04 2020 1:55AM
नवी दिल्ली : पीटीआय

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोविड-19 लसीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणीस ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (डीसीजीआय) परवानगी मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने आज दिली. ही चाचणी भारतात घेतली जाणार आहे. 

शासकीय अधिकार्‍यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की संपूर्ण मूल्यांकनानंतर विषय तज्ज्ञ समितीने (सीईसी) केलेल्या शिफारशींच्या आधारावर देशाचे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी रविवारी रात्री उशिरा ही परवानगी दिली. सीरमला मिळालेल्या परवानगीमुळे कोरोना प्रतिबंधक लस लवकरात लवकर विकसित होण्यास मदत होणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

क्लिनिकल चाचणीसाठी सुरूवातीला सुरक्षाविषयक डेटा केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) यांच्याकडे द्यायचा असतो. या डेटाचे मूल्यांकन डेटा सुरक्षा निरीक्षण बोर्ड (डीएसएमबी) या संस्थेने केलेले असते. ऑक्सफर्ड लसीच्या पहिल्या टप्प्यातील निरीक्षणांचा अभ्यास केल्यानंतरच भारतात पुढील टप्प्यातील चाचणीला मान्यता देण्यात आली. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अस्त्राझेनेकासोबत सीरमही या लस प्रकल्पात भागीदार आहे. सीरमने दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणीस परवानगी मिळण्यासंदर्भात बुधवारी विषय तज्ज्ञ समितीकडे सुधारित प्रस्ताव दाखल केला होता.

लसीसंदर्भात केलेल्या अभ्यासाच्या रचनेनुसार, प्रत्येक स्वयंसेवकाला चार आठवड्यात दोन डोस दिले जातील (पहिला डोस दिल्यानंतर 29व्या दिवशी दुसरा डोस दिला जाईल)  आणि त्यानंतर लसीची सुरक्षा आणि संबंधित व्यक्तीच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडिजची तपासणी केली जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. या चाचणीसाठी देशभरातून वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतील व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे.

सीडीएससीओच्या विशेष तज्ज्ञांच्या पथकाने पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील चाचणीतून मिळालेल्या डेटावर गहन विचारविनिमय केल्यानंतर कोविशिल्ड लसीच्या भारतातील दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचणीस मंजुरी दिल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. ऑक्सफोर्डद्वारा विकसित या लसीच्या दुसर्‍या तसेच तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सध्या ब्रिटनमध्ये सुरू आहेत. तिसर्‍या टप्प्यातील चाचणी ब्राझीलमध्ये आणि पहिल्या तसेच दुसर्‍या टप्प्यातील चाचणी दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे. 

17 शहरांतील 1600 लोकांवर होणार चाचणी

सीरमने दाखल केलेल्या सुधारित प्रस्तावानुसार, देशभरातून निवडलेल्या 17 शहरातील 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले 1600 लोक या चाचणीत सहभागी होतील. 17 शहरांमधील काही मोजक्या संस्थांत दिल्लीतील एम्स, पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज, पाटणातील राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, चंडीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्यकेशन अँड रिसर्च, जोधपूरमधील एम्स, गोरखपूरमधील नेहरू हॉस्पिटल, विशाखापट्टणममधील आंध्र मेडिकल कॉलेज आणि मैसूरमधील जेएसएस अ‍ॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च यांचा समावेश आहे. भारतातील सुदृढ प्रौढांवर कोविशिल्डची चाचणी होणार आहे.

...तर नोव्हेंबरपर्यंत लस उपलब्ध

संपूर्ण जगाला त्रस्त केलेल्या कोरोना व्हायरसवरील ऑक्सफोर्डच्या लसीने आशेचा किरण दाखवला आहे. याच मालिकेत सीरमची पुढच्या वर्षभरात एक अब्ज लस निर्मितीची योजना आहे. सीरम एकूण लस उत्पादनांपैकी 50 टक्के लसी भारतासाठी उपलब्ध करून देणार असून, उर्वरित लसी अन्य देशांना पाठविण्यात येतील. सर्व काही नियोजनानुसार झाले, तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत भारतात लस उपलब्ध होऊ शकते. 

 "