Thu, Nov 26, 2020 21:43होमपेज › National › आयुर्वेदिक डॉक्टर्सना शस्त्रक्रियेस परवानगी

आयुर्वेदिक डॉक्टर्सना शस्त्रक्रियेस परवानगी

Last Updated: Nov 23 2020 12:03AM
नवी दिल्ली :आयुर्वेदीक डॉक्टरांसंबंधी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, त्यानुसार त्यांना शस्त्रक्रियेची परवानगी देण्यात येणार आहे. सर्वसाधारण शस्त्रक्रियांबरोबरच ऑर्थोपेडिक सर्जरी, कान, नाक आणि घसा अशा 58 प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे.

सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळताच याबाबत पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना सखोल माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिसीनने म्हटले आहे. या निर्णयावर इंडियन मेडिकल कौन्सिलने तीव्र आक्षेप नोंदवला असून, चोर दरवाजाने मेडिकल संस्थांमध्ये प्रवेश देण्यासारखा हा प्रकार असल्याचे म्हटले आहे.

आयुर्वेदाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेसंबंधीचे शिक्षण दिले जाते. मात्र प्रत्यक्ष प्रॅक्टिस करत असताना त्यांना शस्त्रक्रियेसाठी परवानगी आहे की किंवा नाही, याबाबतचे स्पष्ट मार्गदर्शन आतापर्यंत नव्हते. ते आता या अध्यादेशामुळे स्पष्ट होणार आहे. या अध्यादेशानुसार आयुर्वेदातील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कान, नाक, घसा आणि जनरल सर्जरीसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयावर इंडियन मेडिकल कौन्सिलने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. चोर दरवाजाने मेडिकल संस्थांमध्ये प्रवेश देण्यासारखा हा प्रकार आहे. त्यामुळे नीटसारख्या परीक्षेचे महत्वच संपुष्टात येईल, अशी भीती व्यक्त केली आहे. हा पूर्णपणे एकतर्फी निर्णय असून,  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिसीनने लक्ष्मणरेषा ओलांडल्यास त्याचे विपरीत परिणाम होतील, असा इशारा दिला आहे.