Mon, Apr 12, 2021 02:42होमपेज › National › बिहारमध्ये पराभवानंतरही विरोधक जिंकले!

बिहारमध्ये पराभवानंतरही विरोधक जिंकले!

Last Updated: Nov 21 2020 9:16PM
पाटणा : वृत्तसंस्था

बिहारमधील अटीतटीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तेचा सारिपाट मांडला आहे. सत्ता काबीज करीत नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री झाले; पण यावेळी सरकारचे स्वरूप बदलले आहे. भाजपच्या ताकदीचा परिणाम बिहारच्या राजकारणात आतापासूनच दिसू लागला आहे. सुशीलकुमार मोदींच्या जागी उपमुख्यमंत्रिपदाचे दोन नवीन चेहरे आणि जेडीयूऐवजी विधानसभा अध्यक्षपद भाजपच्या झोळीत जाणे हे त्याचाच परिपाक आहे. त्याचबरोबर जेडीयू कोट्यातून मंत्री बनलेल्या मेवालाल चौधरी यांनी अवघ्या तीन दिवसांत मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नितीशकुमार सरकारला धक्का दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाला आयते कोलित मिळाले आहे.

नितीशकुमार यांच्यासह 15 मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली. यामध्ये दोन उपमुख्यमंत्र्यांसह सातजण भाजपच्या कोट्यातील, नितीशकुमार यांच्यासह सहाजण जेडीयू कोट्यातील आणि हिंदुस्तानी आम मोर्चा आणि विकास इन्सान पार्टी यांचे प्रत्येकी एकजण मंत्रिमंडळात होते; पण मेवालाल चौधरी यांनी शपथ घेतल्यानंतर विरोधकांनी त्यांची प्राध्यापक भरतीची जुनी फाईल उघडली आणि त्यांची कोंडी केली.

नितीशकुमार कमी जागा मिळवूनही मुख्यमंत्री झाले असले तरी त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला आहे. त्यांचा द़ृष्टिकोन बदलल्याचे स्पष्टपणे शपथविधी सोहळ्यापासून दिसत आहे. नितीशकुमार यांचे प्रतिस्पर्धी सुशीलकुमार मोदी यांना बाजूला करून दोन उपमुख्यमंत्री केले. प्रादेशिक आणि जातीय व्होट बँक राखण्यासाठी भाजपने तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांना उपमुख्यमंत्री बनवून भाजप ‘लंबी रेस का घोडा’ बनला आहे. भाजपमध्ये नवीन नेतृत्व निर्माण करून भविष्यात ते स्वबळावर सरकार स्थापन करण्याचे स्वप्न भाजप पाहत आहे. या निवडणुकीत 74 जागा जिंकल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत नितीशकुमार यांनीही यावेळी मुख्यमंत्री होण्यास नकार दिला होता; पण भाजपला रिस्क घ्यायची नव्हती. नितीशकुमार यांच्यासोबतच त्यांना पुढे जायचे आहे.

गत निवडणुकीत काँग्रेसने 41 पैकी 27 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत महाआघाडी करून 70 जागा घेतल्या. मात्र, केवळ 19 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे राजद आणि अन्य घटक पक्ष पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडत आहे. काहीजण उमेदवारी वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करीत आहे, तर कोणी राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत. दरम्यान, पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे बिहार प्रभारी शक्तिसिंह गोहिल आणि प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. अद्याप त्यांचे राजीनामे स्वीकारलेले नाहीत तर राष्ट्रीय नेतृत्वाने अद्याप पराभवाचे चिंतनही केल्याचे दिसत नाही.

जेडीयूकडून राजीनाम्याला नैतिकतेचा रंग, तर विरोधक मानताहेत विजय

ते जेव्हा सबौर कृषी विद्यापीठात कुलगुरू होते तेव्हा 161 सहायक प्राध्यापकांच्या नेमणुकीत मोठा घोटाळा झाला होता. नियुक्तीमध्ये पात्रता आणि तरतुदींकडे दुर्लक्ष केले होते. संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे. नितीशकुमार यांनी त्यांना जदयूच्या कोट्यातून मंत्रिपद दिले. त्यामुळे विरोधकांना हा मुद्दा आयताच मिळाला आणि त्यांनी आवाज उठविला. सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करून मेवालाल यांना शिक्षण खाते दिले. पण, हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच नितीशकुमार यांनी त्यांना समजावले. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर एका तासातच मेवालाल यांना राजीनामा द्यावा लागला. यामुळे बॅकफूटवर आलेली जेडीयू त्याला नैतिकतेचा रंग देत आहे. तर विरोधक हा त्यांचा विजय मानत आहेत.