Wed, May 19, 2021 06:01
१८ ते ४४ वयोगटातील केवळ चार लाख लोकांचे लसीकरण

Last Updated: May 04 2021 3:04PM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
गेल्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असली तरी पहिल्या तीन दिवसांत केवळ चार लाख लोकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती केंद्र सरकारकडून मंगळवारी देण्यात आली. लसीच्या अभावामुळे लसीकरणाचा वेग खूपच मंद असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेसाठी लाखो लोकांनी नोंदणी केली असली तरी पहिल्या तीन दिवसांत फक्त ४ लाख ६ हजार ३३९ लोकांना लस देता आली आहे. राज्यनिहाय आकडेवारीवर नजर टाकली तर छत्तीसगडमध्ये १ हजारो २५ लोकांना लस देण्यात आली असून दिल्लीत ४० हजार २८, गुजरातमध्ये १ लाख ८ हजार १९१, हरियाणामध्ये ५५ हजार ५६५, जम्मू काश्मीर मध्ये ५५८७, कर्नाटकमध्ये २३५३, महाराष्ट्रात ७३ हजार ७१४, ओडिशामध्ये ६८०२, पंजाबमध्ये ६३५, राजस्थानमध्ये ७६ हजार १५१, तामिळनाडूमध्ये २७६४, उत्तर प्रदेशात ३३ हजार ५४४ लोकांना लस देण्यात आली आहे.

आतापर्यंतच्या लसीकरण मोहिमेवर नजर टाकली तर एकूण १५ कोटी ८९ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. १० राज्यातील लसीकरणाचे प्रमाण ६६.९४ टक्के इतके आहे. कोरोनातून बरे होण्याचा म्हणजे रिकव्हरीचा दर ८१.९१ टक्के इतका आहे. गेल्या चोवीस तासात ३ लाख २० हजार २८९ लोक बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ कोटी ६६ लाख १३ हजार २९२ वर गेली आहे.